पिंपरी : बीसीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात ठार झाले. ही बातमी हे विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या आयआयसीएमआर या निगडी-प्राधिकरणातील महाविद्यालयात पोहोचली. एकाच महाविद्यालयातील, एकाच वर्गातील, घट्ट मैत्री असलेले आणि एकाच इमारतीत राहणारे तीन विद्यार्थी दगावले. मन हेलावून टाकणाऱ्या या बातमीने महाविद्यालयात बुधवारी शोककळा पसरली. व्यवस्थापनाने शोकसभा घेऊन महाविद्यालयाला सुटी दिली. निगडी-प्राधिकरणातील इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल अॅन्ड कॉम्प्युटर मॅनेजमेंट (आयआयसी एमआर) या महाविद्यालयाचा एरवी गजबजून जाणारा परिसर आज सुनासुना होता. कार्यालय खुले होते, सकाळी ९ वाजताच शोकसभा घेऊन विद्यार्थ्यांना सुटी दिल्याने विद्यार्थी कोणीच नव्हते. कामकाजासाठी काही कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. परंतु अत्यंत शांत, धीरगंभीर असे वातावरण असल्याने या परिसराला अवकळा आली होती. संस्थेच्या संचालक दीपाली सवाई म्हणाल्या, ‘‘तीन वर्षांपासून या महाविद्यालयात शिक्षण घेणारे हे तीन विद्यार्थी मनमिळाऊ होते. अभ्यासात हुशार होते. सर्वांत मिळून-मिसळून वागणाऱ्या या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. मंगळवारची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू हा महाविद्यालयावरसुद्धा दु:खाचा आघात आहे.विद्यार्थ्यांनी वाहन चालविताना दक्षता घ्यावी. वाहन चालविताना एखादी चूक जिवावर बेतू शकते. आपल्या पालकांची, नातेवाइकांची मन:स्थिती काय होईल, याचा सारासार विचार करावा. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची चूक नाही. मोटारीने त्यांना धडक दिली.रात्रीच्या वेळी वाहनचालक कोणत्या अवस्थेत असतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी, असे या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. किरण धाणे, संकेत समेळ, शुभम भालेकर या विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी विद्यार्थी, शिक्षकांना अश्रू अनावर झाले. शोकसभा संपताच दु:खी अंत:करणाने विद्यार्थी बाहेर पडले. महाविद्यालयात शोककळा पसरली होती. (प्रतिनिधी)
तीन मित्रांच्या मृत्यूने पसरली शोककळा
By admin | Updated: July 23, 2015 04:43 IST