नेहरूनगर : संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रविवारी सकाळी तब्बल चार तास मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) गैरहजर होते. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि पोलिसांना तातडीक विभागात विविध समस्यांना सामोरे जावे लागले. रुग्णाच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शहरातील महापालिकेचे ७५० खाटांचे सर्वांत मोठे असे वायसीएम रुग्णालय आहे. दर रविवारी रुग्णालयामधील सीएमओचा पदभार बदलत असतो. सकाळी चार तास मुख्य वैद्यकीय अधिकारी आपल्या जागेवर उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रत्येक जण कार्यालयात येऊन डॉक्टर कुठे गेले हे विचारत होते. याबाबत माहिती घेतली असता, इतर डॉक्टर, तसेच रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि पोलिसांनाही अधिकारी कोठे गेले हे माहिती नव्हते. यामुळे काही वेळाकरिता रुग्णालयाच्या तातडीक विभागामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी सकाळी रुग्णालयामध्ये संत तुकारामनगर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक शरद काळे यांनी तीन आरोपींना तपासणीकरिता रुग्णालयात सकाळी ९:४५च्या सुमारास आणले होते. परंतु रुग्णालयामध्ये सीएमओ पदावरील आसन रिकामे असल्यामुळे त्यांना दोन तास ताटकळत बसावे लागले. सीएममो कोण आहेत, याची विचारपूस केली असता, कोणालाही सीएमओची जबाबदारी (ड्युटी) कोणाची आहे हे माहीत नव्हते. सीएमओ यांच्या केबिनवर आज कोण सीएमओ आहेत याचा शनिवारचा फलक दिसून होता. यामुळे पोलिसांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज देशमुख यांना कळविले. त्यांनी शवविच्छेदन विभागाचे न्यायवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल साळुंखे यांना सीएमओच्या तातडीक विभागामध्ये जाण्यास सांगितले. साळुंखे यांनी तपासणीसाठी आणलेल्या त्या आरोपींची तपासणी केली. त्यानंतर ते पोलीस निघून गेले. साळुंखेही शवविच्छेदन कामासाठी निघून गेले. मात्र त्यानंतर सीएमओचे आसन बराच वेळ रिकामेच होते. रुग्णालयामधील अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांवर सीएमओ यांची स्वाक्षरी लागत असल्यामुळे ते कुठे आहेत यासाठी कर्मचारी, नागरिकांना शोधाशोध करावी लागली.अखेर दुपारी एकच्या सुमारास अस्थिरोग विभागातील डॉ. देवानंद तायडे यांना सीएमओ या पदाचे आसन सांभाळण्याचे सांगितले. (वार्ताहर)
‘वायसीएम’मध्ये सावळा गोंधळ
By admin | Updated: January 25, 2016 00:55 IST