पुणे : घाऊक बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढली असली तरी त्यामध्ये कच्च्या मालाचे प्रमाण अधिक आहे. तयार आंबा कमी असल्याने अद्यापही भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात तयार हापूसच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीला १५०० ते २ हजार रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात हे दर प्रतिडझन ४०० ते ५०० रुपयांहून अधिक आहेत.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील फळ बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढली आहे. यंदाच्या हंगामात पोषक वातावरण तसेच पाऊस चांगला झाल्याने आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज आहे. त्यानुसार बाजारात आंबा येण्यासही सुरुवात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही दुप्पट असून भाव काही प्रमाणात कमी आहेत. असे असले तरी सध्या बाजारात येणारा बहुतांश आंबा कच्च्या स्वरूपाचा आहे.कृत्रिम पद्धतीने आंबा पिकविण्यासाठी सध्या अनेक बंधने आहेत. त्यामुळे बाजारात तयार आंब्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. रविवारी बाजारात सुमारे १० ते १२ हजार पेट्यांची आवक झाली. त्या तुलनेत केवळ ३ हजार पेटी तयार आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता. ग्राहकांकडून तयार आंब्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे अजूनही भाव तेजीत आहे. घाऊकच्या तुलनेत किरकोळ बाजारात आंब्याचे भाव तुलनेने अधिक आहेत.रविवारी घाऊक बाजारात रत्नागिरी हापूसच्या (कच्चा) ४ ते ७ डझनाच्या एका पेटीस १००० ते १५०० रुपये तर ८ ते १० डझनाच्या पेटीस १८०० ते २५०० रुपये भाव मिळाला. तयार आंब्याच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीस १५०० ते २००० रुपये तर ८ ते १० डझनाच्या एका पेटीस २००० ते ३००० इतका भाव मिळाला असल्याची माहिती आंब्याचे व्यापारी करण जाधव यांनी दिली.
आंब्याचे भाव आवक्याबाहेरच
By admin | Updated: April 10, 2017 03:02 IST