पिंपरी : महापालिकेतील उमहापौर, स्थायी समिती, महिला व बाल कल्याण समिती, विधी समिती अशा विविध समितींवर महिलांचे वर्चस्व असल्याने महापालिकेत महिलाराज निर्माण झाले आहे. स्थायी समितीमध्ये आठ महिला सदस्या व अध्यक्षपदाची धुराही महिला सभापतीकडे दिली आहे.राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे स्त्रियांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. पालिकेतही महिलांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. महापालिकेच्या कारभारात महिला कारभारी असणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपाच्या पहिल्या उपमहापौर होण्याचा मान शैलजा मोरे यांना तर स्थायी समिती सभापती म्हणून सीमा सावळे यांना मान मिळाला. कारभाराला शिस्त लावत चुकीच्या प्रथा व परंपरांना फाटा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महिला व बाल कल्याण समितीवर सुनीता तापकीर, तरविधी समितीवर शारदा सोनवणे यांची निवड झाली. महापालिकेच्या आर्थिक चाव्या असणाºया स्थायी समितीत महिलांना समान जागा मिळाल्या आहेत.पालिकेतील १६ महत्त्वाच्या पदांपैकी ९ समित्यांवर महिलाराज आहे. जैवविविधता समिती सभापतिपदी उषा मुंढे, क प्रभाग सभापतिपदी अश्विनी जाधव, ई प्रभाग अध्यक्षपदी भीमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षपदी साधना मळेकर यांची निवड झाली. जैवविविधता समितीत तर सहाही महिला सदस्या आहेत. महिला व बालकल्याण समितीवर ७ महिला आहेत.- महापालिकेतील स्थायी समिती ही सक्षम समिती असते. शहराच्या विकासाचे नियोजन तसेच धोरणात्मक निर्णय स्थायीत घेतले जातात. सोळापैकी अध्यक्षांसह आठ महिला नगरसेविका स्थायीच्या सदस्या आहेत. अध्यक्षपदाची सुत्रे नगरसेविका ममता गायकवाड यांच्या हाती दिली आहेत. भाजपाने दुसºयांदा स्थायी समितीचे अध्यक्षपद मागसवर्गीय महिलेकडे दिले आहे. भाजपाकडून अध्यक्षा ममता गायकवाड, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, साधना मळेकर, नम्रता लोंढे, अर्चना बारणे आणि राष्ट्रवादीकडून प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर यांना स्थायीत काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रथमच नगरसेवक झालेल्या गायकवाड यांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणार असल्याचे सांगितले. तर उपमहापौर शैलजा मोरे यांनीही विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या शारदा सोनवणे आणि सुनीता तापकीर यांनीही आपली चुणूक अर्थसंकल्पातून दाखविली आहे.
समित्यांत महिलाराज; स्थायी, बाल कल्याण व विधीच्या सभापतिपदी संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:16 IST