लोणावळा : शुक्रवारी रात्रीपासून लोणावळा शहरात सुरू झालेला दमदार पाऊस उसंत घेण्यास तयार नाही. पावसाची संततधार सुरूच असून, शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत शहरात तब्बल ६३७ मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटमाथ्यावर लोणावळा शहर असल्याने शहरात थोडा जरी पाऊस कमी झाला, तरी पाणी वाहून जात आल्याने अद्याप तरी शहराला पूर संकटाचा धोका नाही. मात्र, पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता यंत्रणांनी वर्तवली आहे.लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत तब्बल २६० मिमी पाऊस झाला. सोमवारअखेरपर्यंत ९३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी ४ जुलैपर्यंत १२३८ मिमी पाऊस झाला होता. या वर्षी जून महिन्यात लोणावळ्यात जेमतेम पाऊस झाल्याने नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. जुलैच्या १ तारखेलाच मॉन्सून सक्रिय झाला असून, जोरदार कोसळत आहेत. त्यामुळे तीनच दिवसांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे तर काही भागात सीमाभिंती पडल्या आहेत. सकल भागात गटारे गायब झालेल्या रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे.(वार्ताहर)पावसाचा जोर मंदावला; रिपरिप सुरूचमागील तीन दिवसांपासून लोणावळा शहरात धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी दिवसभरात काही प्रमाणात मंदावला असला, तरी संततधार सुरूच आहे. दिवसभरात शहरात ६५ मिमी पाऊस झाला. मागील तीन दिवसांत ६३७ मिमी पाऊस झाला होता.जुलै महिन्याचे तिन्ही दिवस लोणावळ्यात जोरदार पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. दोनच दिवसांत भुशी धरण ओव्हर फ्लो झाले. डोंगरदऱ्यांमधून धबधबे वाहू लागले होते. सकाळी पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला होता. दुपारपर्यंत काही वेळ उघडीप घेत सरीवर पाऊस पडला. दुपारनंतर पावसांची संततधार सुरू आहे.
लोणावळ्यात जनजीवन विस्कळीत
By admin | Updated: July 5, 2016 03:07 IST