लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड ते नारायणगाव परिसरात अनेक मोठ्या हॉटेलमध्ये कायद्याचा फायदा घेत दारूविक्री जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही बड्या हॉटेल व्यावसायिकांना कायद्याचा फायदा मिळवून दिल्याने खेड, मंचर, नारायणगाव येथील महामार्गावरील परमिट बिअर बार जोमात सुरू झाले आहे. ‘फक्त वळसा घालून या अन् दारू प्या,’ असे चित्र आहे.राज्य महामार्गावरील दारूविक्री बंद झाल्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी बंद करण्यात आल्या होत्या. अनेक दुकानदारांनी आपले दुकान ५०० मिटरच्या बाहेर आहे, असा दावा केला आहे. परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी बनावट दारूही मिळत आहे. त्यामुळे तळीरामांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. खेड चांडोली, मंचर, तसेच नारायणगाव येथे महामार्गालगत दारू विक्री करणारी दुकाने आहेत. ही दारू विक्री करणारी हॉटेल ५०० मीटरच्या आतमध्ये आहे. ही हॉटेलमालकांनी शक्कल लढवून महामार्गावरील हॉटेलचे प्रवेशद्वार बंद करून ५०० मीटर बाहेरच्या बाजूने शेजारील रस्त्याने चालत जाऊन पुन्हा हॉटेलकडे येण्यासाठी रस्ता तयार केला. तसेच दुसरे रस्ते दाखवले आहेत. खेड येथील चांडोली येथे एक हॉटेलमध्ये मागच्या दाराने दारू विक्री जोरात सुरू आहे. या हॉटेललगत अर्धा किलोमीटर अंतरावर चांडोली ग्रामीण रुग्णालय आहे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब गरजू रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णालय व या दारूविक्री करणाऱ्या हॉटेलकडे जाण्याचा रस्ता एकच असल्यामुळे या हॉटेलमधून दारू पिऊन बाहेर पडणाऱ्या तळीरामांचा त्रास येथे येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होत आहे. हॉटेललगतच्या रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी गाड्या उभ्या असल्यामुळे येथून अगदी रुग्णवाहिकांनाही अडखळतच मार्ग काढावा लागतो. तळीरामांची वर्दळ सकाळपासूनच असल्यामुळे स्थानिक नागरिकांना विनाकारण त्रास होतो. याच रस्त्यावर पुढे शासकीय औद्योगिक परीक्षण संस्था आहे. या संस्थेत ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी याच रस्त्याचा वापर करत असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे. मात्र शिक्षणासाठी यायचे तर मग हा त्रास सहन करावा लागणारच, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
फक्त वळसा घालून या अन् दारू प्या
By admin | Updated: June 20, 2017 07:16 IST