पिंपरी : निविदा नस्ती हेतुपुरस्सर गहाळ केल्याने आणि नियमबाह्यपणे बीले अदा केल्याप्रकरणी महापालिकेतील विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या दोन तर महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याची एक वेतनवाढ स्थगित केली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली आहे. वेतनवाढ स्थगित केलेल्या विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव गणेश राऊत आहे. कामकाजाची मुळ निविदा नस्ती चार्ज हस्तांतरणावेळी गहाळ झाल्याने आणि वरिष्ठांशी उद्धट वर्तन केल्याप्रकरणी राऊत यांची खातेनिहाय चौकशी केली. त्यात नस्ती गहाळ झाल्याचे आणि करारनाम्यानुसार हायमास्क दिवे बसविल्याची खात्री केली नाही. निविदा नस्ती उपलब्ध नसताना, प्रत्यक्ष कामकाज मुदतीत झाले नसताना संगनमताने रनिंग बिलाद्वारे रक्कम अदा केली. संचिका हेतुपुरस्सर गहाळ केल्याचे चौकशीत सिद्ध झाले. त्याचबरोबर सायन्स पार्क येथे रोहित्र संच बसविण्याच्या कामाचा आदेश न देता रोहित्र संच बसविले. खोटे रेकॉर्ड तयार करत बील अदा केल्याने महापालिकेची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी राऊत यांनी केलेला खुलासा आयुक्तांना संयुक्तित वाटला नाही. निविदा नस्ती हेतुपुरस्सर गहाळ केल्याने आणि नियमबाह्यपणे बीले अदा केल्याने कनिष्ठ अभियंता गणेश राऊत यांच्या दोन वेतनवाढी स्थगित केल्या आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी या गट 'ब' च्या पदावर कार्यरत असलेले डॉ. विनायक पुरुषोत्तम पाटील यांची एक वेतनवाढ स्थगित केली असून डॉ. पाटील वायसीएमएच रुग्णालयाच्या मेडिसीन विभागात आहेत. डॉ. पाटील हे बाह्यरुग्ण विभागामध्ये वारंवार अनुपस्थित असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने त्याबाबत १ मार्च २०१६ रोजी समक्ष शहानिशा केली. त्यावेळी रुग्णांची रांग लागली होती. डॉ. पाटील, त्यांचे कोणतेही कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. याबाबत डॉ . पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना उद्धटपणे उत्तरे दिली. वरिष्ठांचा अपमान करुन गैरवर्तन केले. तसेच महिला वैद्यकीय अधिकारी यांना धमकी दिली. सेवेतून कमी करण्याबाबत भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवून गैतवर्तन केले. त्यांनी शिस्तीचा भंग केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे डॉ. पाटील यांची एक वेतनवाढ स्थगित केली आहे. या आदेशाची नोंद त्यांची सेवा पुस्तकात केली जाणार आहे. कामकाजात गैरवर्तन अथवा उद्धट स्वरुपाचे वर्तन केल्याचे निर्दशनास आल्यास जबर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
कनिष्ठ अभियंता,डॉक्टरची वेतनवाढ रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:44 IST