वडगाव मावळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी ज्ञानेश्वर वाळुंज यांच्या हत्येच्या निषेधार्थ मनसेनेच्या वतीने बुधवारी मावळ तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. कामशेत येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यात इतर ठिकाणीही कमी-अधिक प्रमाणात बंदला प्रतिसाद मिळाला. जैन इंग्लिश स्कूलसमोर पस्ताकिया यांच्या घराजवळ बाजारपेठ रस्त्यावर मंगळवारी दुपारी १२ वा. वाळुंज यांचा राजकीय पूर्ववैमनस्यातून पिस्तुलातून गोळ्या झाडून खून झाला होता. वडगाव, लोणावळा, तळेगाव दाभाडेसह ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला. कामशेत येथे बाजारपेठ रस्ता, शिवाजी चौक, साईबाबा चौक, रेल्वे स्टेशन, इंद्रायणी कॉलनी , पंचशील कॉलनी व जुना मुंबई-पुणे महामार्गाचा परिसर एरवी वर्दळीचा असतो. बंदमुळे बुधवारी रस्ते, स्टेशन परिसर व चौक ओस पडले होते. एरवी वाहतूक कोंडी होत असलेले रस्ते निर्मनुष्य झाल्याने शांतता दिसत होती. शाळा, महाविद्यालय, बॅक व इतर कार्यालय बंद होती. रस्त्यात केवळ रुग्णवाहिका व पोलीस वाहनेच दिसत होती. अभावानेच एखादे खासगी वाहन येत होते. रस्त्यात व चौकात सशस्त्र पोलीस जवानांचा कडक बंदोबस्त असल्याने कामशेतमध्ये छावणीचे स्वरूप आले होते. (वार्ताहर)
कामशेतमध्ये कडकडीत बंद
By admin | Updated: August 6, 2015 03:34 IST