पिंपरी : शाखानिहाय प्रमुखांची निवड करणे, युवा संघटन करणे, महापालिकेकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, वॉर्डनिहाय बैठकांचे नियोजन शिवसेनेने केले आहे. संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात असून, संघटना विस्ताराच्या दृष्टीने काम सुरू आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षवाढीवर भर दिला जात आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आडाखे बांधले जात आहेत. त्यानुसार शिवसेनेही तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. संघटनात्मक विस्ताराचा प्रस्ताव, प्रभागनिहाय समितीची निवड, प्रभागप्रमुख, गटप्रमुख निवडीची यादी तयार आहे. ती पक्षप्रमुखांकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. शाखानिहाय गटप्रमुख निवडले असून, त्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. तसेच मतदारनोंदणी, मतदारयाद्यांची दुरुस्ती याबाबतचे काम केले जात आहे. तसेच बूथनिहाय नियोजन शिवसेनेने केले आहे. दुबार नावे काढण्यासाठी निवडणूक विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. तसेच पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील याद्यांचे एकत्रीकरण केले जात आहे. युवा सेनेचा मेळावाही या महिन्यात होणार आहे. त्यासाठी युवा सेनाप्रमुख येणार आहेत. तसेच महिला आघाडीचाही विस्तार केला जाणार असल्याचे शिवसेना समितीने कळविले आहे.महापालिकेकडून विविध चुकीची कामे सुरू केली आहेत. त्याविरोधात आवाज उठविण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरण आणि प्राधिकरण बरखास्तीविषयी शिवसेनेने आवाज उठविला आहे. महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर होणाऱ्या उधळपट्टीविरोधात आंदोलन केले आहे. जनतेच्या पैशांची होणारी उधळपट्टीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा पक्षसंघटनेच्या विस्तारावर भर
By admin | Updated: June 1, 2016 00:46 IST