पिंपरी : कासारवाडीतील रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या भाजीविक्रीच्या दुकानास अचानक आग लागली. ही आग काही क्षणांतच शेजारील सायकल दुरुस्तीच्या दुकानांपर्यंत पोहचली. या घटनेत दोन्ही दुकाने खाक झाली. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली.पिंपरी अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडीतील रेल्वे स्थानकाशेजारी इमरान बागवान यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूने अचानक आग लागली. संपूर्ण दुकान लाकडी फळ्यांचे असल्याने काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. या आगीत दुकानातील दहा कांद्यांच्या गोण्यांसह संपूर्ण दुकान खाक झाले. या दुकानाशेजारीच लकीफ सय्यद यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. आग पसरून सायकल दुकानापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी अग्निशामक विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन्ही दुकानांच्या आगीवर अर्ध्या तासानंतर नियंत्रण मिळवले. या आगीत दुकानांसह १० सायकलींचे जळून नुकसान झाले. दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले असून, आगीचे कारण स्पष्ट झाले नसल्याचेही अग्निशामक विभागाने सांगितले. (प्रतिनिधी)
कासारवाडीतील दोन दुकानांना आग
By admin | Updated: January 9, 2016 01:31 IST