पिंपरी : फेसबुकच्या माध्यमातून उच्चशिक्षित महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणारा अझुबुके अरिबीके (वय ३८) हा नायजेरियन भामटा भोसरी पोलिसांच्या हाती लागला आहे. दिल्लीमधून या आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने भारतभरातील अनेक उच्चशिक्षित महिलांना फेसबुकच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे मान्य केले आहे.डॉ. प्रतिभा श्यामकुवर यांनी फसवणुकीविषयी तक्रार दाखल केली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. डॉ. श्यामकुवर या महिलेने मागील महिन्यात याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भोसले व सायबर विभागाच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. दिल्ली पोलिसांनी नायजेरियन तरुणाला अटक केली.पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, विविध शहरांमधील उच्चशिक्षित महिलांशी फेसबुकच्या माध्यमातून आरोपी मैत्री करायचा. आपण स्वत: परदेशात असून, तुम्हाला भेटवस्तू पाठवत आहे. ते कस्टमकडून सोडवण्यास सांगायचा. नंतर त्याचीच महिला साथीदार महिलांना फोन करून बँकेत लाखोंची रक्कम भरायला सांगत. या प्रकारामध्ये अझुबुके अरिबिके याचे आणखी चार-पाच साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आतापर्यंत या टोळीने बंगळुरू येथील महिलेची ६० लाख, कुलू-मनाली येथील महिलेची ३० लाख, वसई येथील महिलेची ८ लाख, निगडी येथील महिलेची ५ लाख, तक्रार करणाºया महिलेची ४२ लाखांची फसवणूक केली होती. वसई व अन्य ठिकाणी आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत.
फेसबुकच्या माध्यमातून महिलांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:59 IST