पिंपरी : एमआयडीसी भागात दररोज सहा ते सात तास वीजपुरवठा खंडित केला जातो. तळवडे, चिखली, भोसरी सर्वच भागात वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा फटका आर्थिक मंदीत पिचलेल्या उद्योजकांना सोसावा लागत आहे. एमआयडीसीत विजेची होणारी दरवाढ व वारंवार वीज खंडित होत असल्याने कामाचे तास कमी होऊन आर्थिक उलाढाल कमी होत आहे.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दर वर्षी ५.५ टक्के चक्रवाढ पद्धतीने दरवाढ करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला आहे. नव्या प्रस्तावामुळे ३९ हजार कोटींचा आर्थिक बोजा उद्योजकांवर पडणार आहे. मे, जून व जुलै महिन्यासाठी इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली १.१ टक्के दरवाढीचा निर्णय झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्क्यांनी विजेचे दर जास्त आहे. महाराष्ट्रापुरती असणारी वीजदरवाढ आणि जागतिक मंदी यामुळे औद्योगिक क्षेत्र संकटात आहे. त्यातून सावरण्याची शक्यता कमी आहे. त्याचा फटका कामगारांना बसायला लागला असून कपात होत आहे. सध्या बहुतांश कारखाने एका शिफ्टमध्ये सुरू असून, कामगारांचे पगार करायची ऐपत राहिली नाही, अशा तक्रारी लघुउद्योजकांकडून येत आहेत. उत्पादनात सतत घट होत असल्याने उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.उद्योजकांकडून कामगारांची कपात करण्यात येत आहे. यंदा पगारवाढही फारशी झाली नसून, कामगारांना तुटपुंज्या पगारात काम करावे लागत आहे. उत्पादनात घट झाल्याने छोट्या उद्योजकांना पाच दिवसांचा आठवडा करावा लागला आहे. (प्रतिनिधी)
उद्योजकांच्या उलाढालीला शॉक
By admin | Updated: July 13, 2016 00:28 IST