लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : महानगरपालिका प्रशासन नागरवस्ती विभागामार्फत दर वर्षी विविध योजना राबविते. या योजनांच्या पात्रता निकषांमध्ये आवश्यक ते बदल करून मराठा समाजाच्या मुलांना या योजनांमध्ये सहभागी करवून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. मनपा प्रशासनाच्या नागरवस्ती विभागाकडून विविध योजना दर वर्षी राबविल्या जातात. यातील योजना क्रमांक ४ अंतर्गत शहरातील सर्व महिला व मुलींना संगणक साक्षर बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. योजना क्रमांक २७ अंतर्गत मागासवर्गीय मुले व मुलींनी संगणक साक्षर बनविले जाते. योजना क्रमांक ४ अंतर्गत मराठा समाजातील मुली या शासकीय योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. योजना २४ अंतर्गत मागासवर्गीय मुलांनाही याचा लाभ मिळतो. जर मराठा समाजातील मुलींना याचा लाभ मिळत असेल, तर मुलांना का नाही असा सवाल पत्रकाद्वारे प्रशासनाला विचारला आहे. समान हक्काद्वारे मुलांनाही या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. मागणीचे निवेदन देताना किरण झराडे, रोहित सावंत, मनोज वंजारी, समीर मुलाणी, अमित खंडागळे, मंगेश गोरे, हृषिकेश करनेवार उपस्थित होते.
नागरवस्ती योजनांचा लाभ देण्याची मागणी
By admin | Updated: May 10, 2017 03:59 IST