पिंपरी : पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या उद्धव आसाराम उनवणे (वय ६५, रा. आळंदी, मूळ रा. नाशिक) या ज्येष्ठ नागरिकाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पत्नी, जावयासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकवरून पैसे घेऊन उनवणे बुधवारी वल्लभनगर बसस्थानकात आले होते. उद्धव उनवणे (वय ६५) हे मूळचे नाशिकचे, परंतु सध्या आळंदीत राहत होते. आळंदीतील घराचे भाडे थकले होते. ही भाड्याची रक्कम घेऊन ते नाशिकहून वल्लभनगरला आले. वल्लभनगर स्थानकातून ते नाशिक फाट्याकडे जात होते. त्या वेळी तिघांनी त्यांचा पाठलाग केला. तुम्ही उनवणे आहात काय, अशी विचारणा केली. तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्याकडील २० हजार रुपयांची रोकड काढून घेतली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. मारहाण करून जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यामध्ये ते गंभीररीत्या भाजले. पेटवून दिल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले होते. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तक्रार घेण्यास दिरंगाई केली. आत्महत्येचा प्रयत्न असावा, असा अंदाज बांधत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु वयोवृद्ध गृहस्थ गंभीर भाजला असल्याने फिर्याद दाखल करावी, अशी मागणी केल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी संबंधितांना अटक करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)याप्रकरणी फिर्याद दाखल करताना पत्नी सुमन, जावई ज्ञानेश्वर जयंत महाले यांच्यासह अन्य तिघांविरोधात संशय व्यक्त केला होता. भाजलेल्या उनवणे यांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोसरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पेटविलेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू
By admin | Updated: March 10, 2017 04:54 IST