पिंपरी : राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय महागडी भेटवस्तू स्वीकारल्याने महापालिकेचे माजी आयुक्त राजीव जाधव अडचणीत आले आहेत. परंतु, शुभेच्छाशिवाय अशा प्रकारची कोणतीही भेटवस्तू स्वीकारली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व काही अधिकाऱ्यांनी आलिशान हॉटेलमध्ये माजी आयुक्त राजीव जाधव यांना दोन दिवसांपूर्वी शाही निरोप दिला. त्या वेळी जाधव यांना किमती भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच, या महागड्या हॉटेलमधील खर्चाची जबाबदारी काही ठेकेदारांनी घेतल्याची चर्चा आहे. यापूर्वी शहरातील अनेक आयुक्तांचा निरोप समारंभ झाला. परंतु, अशा पद्धतीने शाही निरोप कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वाट्याला आला नाही. सत्ताधारी पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदारांकडून केवळ जाधव यांना दिलेला महागडा निरोप चर्चेचा विषय झाला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा अधिनियमानुसार कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने आलिशान हॉटेलमध्ये निरोप समारंभ व महागडी भेटवस्तू स्वीकारण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, आयुक्त जाधव यांनी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे आयुक्तांची कारकीर्द अडचणीत आली आहे. (प्रतिनिधी)आयुक्त राजीव जाधव यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी चांगले काम केले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपली जबाबदारी होती. मात्र, अशा कार्यक्रमास ते उत्सुक नव्हते. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. कोणतीही भेटवस्तू त्यांनी स्वीकारली नाही. राजकारण करणे चुकीचे आहे.- मंगला कदम, पक्षनेत्या, राष्ट्रवादी महापालिका अधिकाऱ्यांनी निरोप समारंभाचा कार्यक्रम घेतला होता. त्या ठिकाणी पदाधिकारी व काही नगरसेवक आले. त्यांनी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला. परंतु, शुभेच्छाशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारलेली नाही. त्यामुळे शासनाच्या परवानगीचा प्रश्नच निर्माण होत नाही.’’- राजीव जाधव, माजी आयुक्तआयुक्तांसाठी निरोप समारंभ ठेवणे ही नवीन गोष्ट नाही. परंतु, सध्या राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. या काळात आलिशान हॉटेलमध्ये कार्यक्रम घेऊन महागड्या भेटवस्तू देणे चुकीचे आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून चुकीचा पायंडा पाडला जात आहे.- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते
आयुक्तसाहेब, निरोप कसला शाही घेता!
By admin | Updated: May 5, 2016 04:24 IST