पुणे : वडगाव बुद्रुक-हिंगणे खुर्द (प्रभाग ३४)मध्ये सर्वसाधारण गटातील महिलांसाठी दोन जागा आरक्षित झाल्याने प्रभागातील समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. सक्षम महिला उमेदवारांचा शोध सर्वच पक्षांतून सुरू झाला आहे. उर्वरित एक जागा अन्य मागासवर्गीयांसाठी तर चौथी जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली आहे. वडगाव बुद्रुक-हिंगणे खुर्दच्या प्रभागात मूळचे वडगाव, हिंगण्याचे गावकरी, पुण्यातून गेल्या दशकभरात राहण्यासाठी गेलेले स्थलांतरित, अन्य गावांमधून, प्रांतांमधून वास्तव्यासाठी आलेले आणि झोपडपट्टीवासीय अशा साऱ्यांची संमिश्र वसाहत आहे. या प्रभागात सोसायट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अन्य भागांप्रमाणेच बंगले, चाळी, उच्चभ्रू वसाहती याही मतदारसंघांत आहेत. या प्रभागातील नागरिकांची पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची आगामी तिसरी पंचवार्षिक खेप आहे. ग्रामीण-निमशहरी तोंडवळा पूर्णपणे बदलून या प्रभागाचे पूर्णपणे शहरीकरण झाले आहे.गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीतील विठ्ठलनगर भाग या प्रभागाला जोडला गेला, तर ५ वर्षांपूर्वी या प्रभागात असलेला हायवे ते ओढा तसेच नऱ्हे आंबेगावमधील काही भाग धायरी-सनसिटी प्रभागाला (क्रमांक ३३)जोडला गेला.महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत वडगाव प्रभागातून राष्ट्रवादीचे विकास दांगट पाटील, संगीता अक्रुर कुदळे तर हिंगणे आनंदनगर प्रभागातून भाजपाचे श्रीकांत जगताप व मंजुषा नागपुरे निवडून आले होते. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेनेसह सर्वच पक्षांमधून लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या जास्त असल्याने कोण उमेदवार कोणत्या पक्षातून मतदारांच्या समोर येईल याची खात्री आज देता येत नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजपा- सेना युती यावर संभाव्य उमेदवार ठरू शकतील. त्यामध्ये महिलांचे चेहरे नवे असू शकतील. प्रस्थापित राजकीय घराण्यांमधूनही ते असण्याची शक्यता आहे. महिन्याभरानंतर कोणत्या पक्षाकडून कोण, हे चित्र अधिक ठळक होईल. या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील दोन महिलांसाठी जागा असून, महिला उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीच्या संगीता अक्रुर कुदळे, भाजपाकडून मंजुषा नागपुरे, बेबीताई चरवड, अनुपमा लिमये तर कॉंग्रेसकडून रूपाली जाधव अशी काही नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे विकास दांगट पाटील यांच्यासह अक्रुर कुदळे, शैलेश चरवड, काँग्रेसचे प्रसन्न जगताप, हरिदास चरवड तसेच शिवसेनेकडून हरिश्चंद्र दांगट, संतोष गोपाळ, बापू निंबाळकर अशा नावांची सध्या चर्चा आहे. (प्रतिनिधी)
महिलांमुळे बदलली समीकरणे
By admin | Updated: October 14, 2016 05:13 IST