लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथे १५ वर्षे अल्पवयीन शाळकरी मुलीवर शेजारच्या व्यक्तीकडून अत्याचार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार झाला आहे.याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून येथील संभाजी कोलते (वय अंदाजे ४०) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आई, वडील शेतीकामासाठी घराबाहेर गेल्यावर शाळेच्या मधल्या सुट्टीत घरी जेवायला आलेल्या मुलीवर आरोपी संभाजी अतिप्रसंग करीत असे. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी पीडित मुलीला देत होता. भीतीपोटी या मुलीने आपल्यावरील अत्याचाराबाबत मौन बाळगले होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. आईला संशय आल्याने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने हा धक्कादायक प्रकार सांगितला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत आरोपी संभाजीच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाणेमध्ये बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने आरोपी फरार आहे. याबाबतचा अधिक तपास फौजदार आशिष जाधव करीत आहेत.
मुलीवर अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
By admin | Updated: July 2, 2017 01:43 IST