पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षात जुन्या नव्यांचा वाद वाढला आहे. महापालिका निवडणुकीत डावललेल्या आणि स्वीकृतचे गाजर दाखवलेल्या भाजपाच्या निष्ठावानांच्या हाती पक्षाने गाजर दिले आहे. एकूण चोवीसपैकी दोन निष्ठावानांनाच संधी देऊन स्थानिक नेत्यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांची वर्णी लावली आहे.महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून जुन्या नव्यांचा वाद सुरू आहे. सुरुवातीला उमेदवारी, त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवक, सदस्य निवडीत डावलल्याने भाजपात असंतोष वाढला आहे. प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड होणार? अशी आशा सदस्यांना होती. मात्र, त्यांचा हिरमोड झाला आहे. आठ प्रभागातील प्रत्येक तीन अशा एकूण चोवीस जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. १२१ पैकी सत्तर कार्यकर्ते हे निष्ठावान होते. मात्र, त्यांना डावलून केवळ दोनच जणांना संधी दिली आहे. बाहेरून आलेल्या नव्वद टक्के सदस्यांना संधी दिली आहे. प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने कोअर कमिटीची बैठक बुधवारी झाली. त्यात जुन्या-नव्यांचा वाद विकोपाला गेला होता. बैठकीस भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस प्रमोद निसळ, अमर मुलचंदानी, प्रवक्ता अमोल थोरात आदी उपस्थित होते. कोणाला संधी द्यायची? याबाबत चर्चा झाली. त्या वेळी महापालिका निवडणुकीत आपण ज्या इच्छुक निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले त्यांना संधी देणार असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करणे आपली जबाबदारी अशी भूमिका काहींनी मांडली. सदस्य निवडीत जुन्यांना डावलले तर आपल्या पक्षाची बदनामी होईल. त्यामुळे पक्षप्रतिमेला तडा जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली.स्वीकृत सदस्यपदी २४ जणांची वर्णीलोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती सदस्यपदी २४ जणांची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाने प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ दोनच जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपात असंतोष पसरला आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी असेल, अशी माहिती भाजपाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती स्वीकृत सदस्य निवड करण्यात आली. अ प्रभागावर राजेश पोपट सावंत, सुनील मानसिंग कदम, राजेंद्र नामदेव कांबळे यांची निवड जाहीर झाली आहे. तसेच ब प्रभागावर बिभीषण बाबू चौधरी, विठ्ठल बबन भोईर, देविदास जिभाऊ पाटील यांची निवड, तर क प्रभागावर वैशाली प्रशांत खाडे, गोपीकृष्ण भास्कर धावडे, सागर सुखदेव हिंगणे यांची तर, ड प्रभागावर चंद्रकांत बाबूराव भूमकर, संदीप भानुदास नखाते, महेश दत्तात्रय जगताप यांची तर ई प्रभागावर अजित प्रताप बुर्डे, साधना सचिन तापकीर, विजय नामदेव लांडे यांची तर फ प्रभागावर दिनेश लालचंद यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर यांची तर ग प्रभागावर संदीप काशिनाथ गाडे, गोपाळ काशिनाथ माळेकर, विनोद हनुमंतराव तापकीर यांची तर ह प्रभागावर अनिकेत राजेंद्र काटे, कुणाल दशरथ लांडगे, संजय गुलाब कणसे यांची निवड केली आहे.
स्वीकृतपदाची हुलकावणी देत निष्ठावंतांच्या हाती गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:44 IST