भोसरी : बोगस संघटना तयार करून त्या माध्यमातून हप्ते गोळा करणे किंवा एखादी ठरावीक रक्कम घेऊन तडजोड करण्याचे प्रकार एमआयडीसीत वाढले आहेत. अनेक अनधिकृत संघटनांकडून या माध्यमातून दुकान चालविले जात आहे. चोऱ्या व दमदाटी यामुळे एमआयडीसी असुरक्षिततेच्या भोवऱ्यात अडकली आहे. यामुळे वाढत्या चोऱ्यांना आळा घालावा. लूटमार, दादागिरी व ब्लॅकमेलिंग थांबवावे आणि एमआयडीसी सुरक्षित करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. एखाद्या बोगस माथाडी संघटनेची स्थापना करून किंवा युनियन तयार करून त्यावर खोटा रजिस्टर क्रमांक लिहिला जातो. दोन-चार साथीदारांना सोबत घेऊन उद्योजकाची थेट भेट घेतली जाते. कंपनीतील काही कामगारांना हाताशी धरून संघटनेत सहभागी होण्यास प्रवृत्त केले जाते. तुमच्या कंपनीत युनियन तयार करू, असे सांगून उद्योजकांना त्रास दिला जातो. अशा माध्यमातून उद्योजकांकडून हप्ता ठरवून घेतला जातो किंवा एकाच वेळी ठरावीक रक्कम घेऊन तडजोड केली जाते. अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.अधिकृत माथाडी संघटना किंवा युनियन यांना उद्योजक विरोध करीत नाहीत. परंतु, अनधिकृत संघटनांकडून होणाऱ्या त्रासाला उद्योजक वैतागले आहेत. याबाबत उद्योजकांनी पोलिसांकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. (वार्ताहर)
ब्लॅकमेलिंगचा उद्योजकांना त्रास
By admin | Updated: July 14, 2016 00:32 IST