भोसरी : दिघीतील डॉ़ संतोष रोडे यांच्या रोडे हॉस्पिटलमधील रुग्णालयातील वापरलेले हँडग्लोव्ह्ज, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, दूषित सुया, सर्जिकल ब्लेड हा जैववैद्यकीय कचरा घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येणाऱ्या घंटागाडीत टाकण्याचा प्रकार घडल्यामुळे आरोग्य निरीक्षक सुधीर वाघमारे यांनी रोडे रुग्णालयाला पाच हजारांचा दंड आकारला आहे़शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येत होता ़ या वेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने पिशवीत असलेला जैववैद्यकीय कचरा कचरागाडीत टाकला़ तो कचरा गाडीत एका बाजला ठेवत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याला पिशवीतील सुई टोचली़ त्यांनी पिशवी उघडून त्यामध्ये जैववैद्यकीय कचरा आढळून आला़ कर्मचाऱ्यांनी ही माहिती आरोग्य निरीक्षक वाघमारे यांना दिली़ त्यानुसार जैववैद्यकीय कचऱ्याची पाहणी केली असता, कचऱ्यात रोडे रुग्णालयातील नोंदणीकृत पावत्या आढळून आल्या़ यापूर्वीही रोडे रुग्णालयाला जैववैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्यामुळे दंड आकारण्यात आला होता़ तसेच जैववैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकणार नाही, असा जबाब लिहून घेण्यात आला होता़ पिशवीतील जैववैद्यकीय कचऱ्याचा अहवाल तयार करून रोडे रुग्णालयाला पाच हजारांचा दंड आकारण्यात आला़(वार्ताहर)
जैववैद्यकीय कचरा; डॉक्टरला केला दंड
By admin | Updated: October 15, 2016 03:11 IST