पिंपरी : पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकर उद्यानात ‘भीमसृष्टी’ साकारण्यात येणार आहे. यासाठीच्या प्रशासकीय खर्चास मान्यता मिळाली असल्याची माहिती शहर अभियंता एम. टी. कांबळे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहराचा मध्यवर्ती चौक अशी डॉ. आंबेडकर चौकाची ओळख आहे. या चौकाजवळच डॉ. आंबेडकर उद्यान असून, येथे बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे. येथे अनेकजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. १४ एप्रिलच्या दिवशी तर येथे जनसागर लोटलेला असतो. या उद्यानाचा सुमारे पाऊण एकराचा परिसर असून, येथे ‘भीमसृष्टी’ साकारण्यात येणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनातील वैचारिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रसंग असलेले म्यूरल येथे लावण्यात येणार आहेत. यासह त्या प्रसंगाविषयीची सविस्तर माहितीदेखील देण्यात येणार आहे. या ठिकाणी आकर्षक रोषणाईसह सांचीच्या प्रवेशद्वाराप्रमाणे प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मोठ्या भिंतींवर बारा फूट उंच आणि पंधरा फूट रुंद चार म्युरल बसविण्यात येणार आहेत, तर उद्यानातील भिंतींवर अकरा फूट रुंद आणि आठ फूट उंचीचे १५ म्युरल बसविण्यात येणार आहेत.या प्रकल्पासाठी पाच कोटींचा खर्च आहे. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, निविदाप्रक्रिया सुरू असल्याचे कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, खासदार अमर साबळे यांनी महापालिकेच्या भीमसृष्टी प्रकल्पाबाबत माहिती घेण्यासाठी आयुक्त राजीव जाधव यांच्याशी मंगळवारी महापालिका भवनात चर्चा केली. (प्रतिनिधी)
पिंपरीतील चौकात साकारणार ‘भीमसृष्टी’
By admin | Updated: October 14, 2015 03:20 IST