धनत्रयोदशीसाठी तिन्ही प्रहर सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:15 AM2017-10-17T03:15:00+5:302017-10-17T03:15:11+5:30

दिवाळीमध्ये अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशीचा सण साजरा करण्याची प्रथा आहे. व्यापारी वर्गाकडून धनत्रयोदशीला कुबेराचे पूजन केले जाते.

 The best of all trips for Dhanteras | धनत्रयोदशीसाठी तिन्ही प्रहर सर्वोत्तम

धनत्रयोदशीसाठी तिन्ही प्रहर सर्वोत्तम

Next

पुणे : दिवाळीमध्ये अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशीचा सण साजरा करण्याची प्रथा आहे. व्यापारी वर्गाकडून धनत्रयोदशीला कुबेराचे पूजन केले जाते. उद्या (मंगळवारी)व्यापारी आणि दुकानदारांना धन आणि वहीपूजनासाठी सकाळी 10.45 ते 1.40, दुपारी 3 ते 4.30 आणि संध्याकाळी 7.30 ते 9 असा तिन्ही प्रहर सर्वोत्तम मुहूर्त असल्याची माहिती दाते पंचागचे मोहन दाते यांनी दिली.
धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस. या दिवसपासून वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते म्हणून धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. व्यापारी, दुकानदार दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतक-यांसाठी नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात.
मृत्यू हा कुणालाच टळलेला नाही. पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावला जातो. याला यमदीपदान असे म्हटले जाते.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

Web Title:  The best of all trips for Dhanteras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी