पिंपरी (पुणे) : चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेले ३६ बंगले पिंपरी-चिंचवड महापालिकेने शनिवारी जमीनदोस्त केले. जेसीबी, पोकलेन अशा दहा यंत्रांच्या साहाय्याने पहाटेपासून ही कारवाई केली. कारवाईमध्ये १.८ एकर भूभागावरील सुमारे ६३ हजार ९७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. चिखली येथील गट क्रमांक ९० मध्ये बंगलो प्लॉट बांधकाम प्रकल्प करण्यात आला होता.
महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात हा प्रकल्प होता. हे बंगले पाडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. मात्र, संबंधित रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची याचिका फेटाळल्याने ही बांधकामे पाडण्यात आली. या कारवाईत ४०० पोलिसांसह ३५० कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.