तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:38 IST
1 / 7स्मार्टफोनने आपले जीवन जितके सोपे केले आहे, तितकेच मोठे सायबर धोकेही ते सोबत घेऊन आले आहे. आज प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यासाठी डेटा आणि बँकिंग सुरक्षा ही सर्वात मोठी चिंता आहे. याच पार्श्वभूमीवर, टेक दिग्गज गुगलने अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वापरकर्त्यांसाठी एक गंभीर चेतावणी जारी केली आहे. 2 / 7सायबर गुन्हेगार सातत्याने बनावट आणि फसवणुकीचे संदेश पाठवून लोकांना लक्ष्य करत आहेत, ज्याला 'स्मिशिंग' म्हटले जाते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, अमेरिका आणि युरोपमध्ये दररोज लाखो स्पॅम मेसेज पाठवले जात आहेत. वापरकर्त्यांना त्वरित एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास किंवा गोपनीय माहिती सामायिक करण्यास प्रवृत्त करणे, हा या संदेशांचा मुख्य उद्देश असतो.3 / 7हे बनावट संदेश सहसा 'तुमचे टोल पेमेंट अयशस्वी झाले', 'तुमचे पार्सल डिलीव्हर होऊ शकले नाही, तपशीलांसाठी क्लिक करा','रिफंड मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.' तीन बहाण्यांनी पाठवले जातात. वापरकर्त्याने अशा लिंकवर क्लिक करताच, त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स थेट हॅकर्सच्या हाती पडतात. 4 / 7विशेष म्हणजे, हे संदेश अनेकदा विदेशी नेटवर्क किंवा संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून पाठवले जातात, जे सिस्टीममध्ये अडकू नये म्हणून त्यांचे नंबर वारंवार बदलत राहतात. गुगलच्या माहितीनुसार, अँड्रॉइडची सुरक्षा प्रणाली दरमहा कोट्यवधी स्पॅम कॉल्स आणि मेसेज ब्लॉक करते, तर जीमेल सुमारे ९९.९% स्पॅम ईमेल थांबवते. ॲपलनेही आपल्या iOS प्रणालीमध्ये कॉल स्क्रीनिंग आणि मेसेज फिल्टरसारखी नवीन सुरक्षा फीचर्स जोडली आहेत.5 / 7तरीही, सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे कारण हॅकर्स प्रत्येक वेळी फिल्टर टाळण्यासाठी नवीन आणि आकर्षक पद्धती शोधून काढतात. गुगलने स्पष्ट केले आहे की, अँड्रॉइडची सुरक्षा मजबूत असली तरी, याचा अर्थ वापरकर्ते पूर्णपणे सुरक्षित आहेत असे नाही. मोबाइल फोनवर होणाऱ्या या फसवणुकीला स्मिशिंग म्हणतात, जो ईमेलद्वारे होणाऱ्या 'फिशिंग'चा मोबाइल अवतार आहे.6 / 7अमेरिकेच्या एफबीआय एजन्सीने युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरून आलेल्या मेसेजला अजिबात प्रतिसाद देऊ नका आणि तो लगेच डिलीट करा. जर तुमच्याकडून चुकून अशा कोणत्याही लिंकवर क्लिक झाले, तर त्वरित तुमचे बँक खाते तपासा. सोबतच सर्व ऑनलाइन खात्यांचे पासवर्ड त्वरित बदला. आवश्यक असल्यास सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल करा.7 / 7कोणतीही अधिकृत संस्था किंवा बँक तुम्हाला मेसेजद्वारे ओटीपी, पासवर्ड किंवा अकाउंट डिटेल्स कधीही मागत नाही. त्यामुळे कोणताही संशयास्पद मेसेज दिसल्यास सतर्क राहा आणि त्वरित तो डिलीट करा. तुमचा थोडासा निष्काळजीपणा मोठे नुकसान करू शकते, तर योग्य खबरदारी तुम्हाला सायबर फसवणुकीपासून पूर्णपणे वाचवू शकते.