शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐश्वर्या रायला विश्वसुंदरी आणि अभिनेत्री व्हायचे नव्हते तर.. पाहा ऐश्वर्याविषयी माहीत नसलेल्या ९ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2023 11:22 AM

1 / 10
विश्वसुंदरी अर्थात ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) आज ५० वा वाढदिवस. ऐश्वर्या फक्त दिसायलाच सुंदर नसून, अभिनय, अभ्यास यासह विविध भाषांमध्ये निपुण आहे. तिने आजतागायत अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. ऐश्वर्याने आपल्या अभिनयाची जादू फक्त बॉलीवूडमध्ये दाखवली नसून, हॉलीवूडमध्येही तिचा जलवा पाहायला मिळतो. ऐश्वर्या आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली. चला तर मग तिच्याबद्दल काही न ऐकलेले किस्से पाहूयात(9 things you didn't know about Aishwarya Rai Bachchan).
2 / 10
ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या वडिलांचं नाव कृष्णराज राय असे होते, तर ते व्यवसायाने मरीन इंजिनिअर होते. तिच्या आईचं नाव वृंदा राय असे असून, त्या लेखिका आहेत. ऐश्वर्याला एक मोठा भाऊ आहे, त्याचं नाव आदित्य राय असे आहे. ऐश्वर्याची मातृभाषा तुलू असून तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तामिळ इत्यादी भाषांचे ज्ञान आहे.
3 / 10
इयत्ता नववीमध्ये शिकत असताना, तिला कॅमलिन कंपनीच्या जाहिरातीमध्ये झळकण्याची संधी मिळाली. त्यानंतर पेप्सी, कोक आणि फूजी या जाहिरातींमध्येही ती दिसली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ऐश्वर्याला मॉडेलिंगचे प्रस्ताव येऊ लागले होते. नंतर तिने मॉडेलिंग देखील केले.
4 / 10
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी म्हणजेच, १९९४ साली तिने मिस वर्ल्डच्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ८७ देशांच्या प्रतीस्पर्धींना मात देत, तिने हा किताब पटकावला. यामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली होती.
5 / 10
आपल्या फिल्मी करिअरमध्ये ऐश्वर्याने ४५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९७ साली 'इरुवर' या तेलुगु चित्रपटाद्वारे केली. तर त्याच वर्षी 'और प्यार हो गया' या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. यानंतर ऐश्वर्या 'ताल' चित्रपटात दिसली, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. मात्र, तिला खरी ओळख 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटासाठी ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
6 / 10
त्यानंतर ऐश्वर्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. आपल्या फिल्मी करिअरमध्ये सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने अनेक हिट चित्रपट दिले. ऐश्वार्या राय २००३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये, ज्यूरी सदस्य म्हणून मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री वेग-वेगळ्या लूकमध्ये दिसते. तिचे ही लुक्स सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतात.
7 / 10
इतकंच नाही तर, तिच्या नावे एका फुलाच्या जातीचीही घोषणा करण्यात आली होती. हो, नेदरलँड्स बोर्ड ऑफ टूरिझमने २००५ साली ऐश्वर्याच्या नावावर 'ट्यूलिप' या फुलाच्या जातीची घोषणा केली होती. ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.
8 / 10
ऐश्वर्या वाचनात आणि लेखनात तरबेज होती. एका मुलाखतीत ती म्हणते, 'मला जूलॉजी हा विषय फार आवडतो. मॉडेलिंग आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मी वैद्यकीय शिक्षण घेत होते. जर मी अभिनेत्री नसते तर, नक्कीच मेडिकल क्षेत्रात मी माझं करिअर घडवलं असतं.' मुख्य म्हणजे शिक्षणासाठी तिची निवड लातूर आणि नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्येही झाली होती.
9 / 10
ऐश्वर्या ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे, जिचा मेणाचा पुतळा मादाम तुसाद संग्रहालयात बसवण्यात आला आहे. पुतळ्याचं स्वरूप हे उभेउभ ऐश्वर्यासारखेच आहे.
10 / 10
२००७ साली ऐश्वर्याने अभिषेकसह लग्नगाठ बांधली. अभिषेकच्या आधी तिचे नाव अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्याशी जोडले गेले होते. ज्यामुळे ती प्रचंड प्रकाशझोतात आली होती. ऐश्वर्या आणि अभिषेकने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'गुरु' या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. २००७ साली 'गुरू' चित्रपटाच्या टोरांटो येथील प्रिमियरच्या दरम्यान, तेथील एका हॉटेलच्या बाल्कनीमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. त्याच्या प्रपोजला ऐश्वर्याने लगेच स्वीकारले. तिथून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं.
टॅग्स :Aishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनCelebrityसेलिब्रिटी