भारताच्या स्वप्नाला लागणार ब्रेक? डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक झटका; पाकिस्तान खुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:39 IST
1 / 10अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर गुडघे टेकवण्याची वेळ यावी म्हणून मोठं पाऊल उचललं आहे. ट्रम्प यांनी प्रशासनाला निर्देश देत इराणच्या चाबहार पोर्टाला निर्बंधातून दिलेली सूट संपवण्यात यावी असे आदेश दिलेत. याआधी अमेरिकेने अशरफ गनी सरकार असताना भारताला अफगाणिस्तानपर्यंत माल पोहचवण्यासाठी चाबहार बंदराला निर्बंधातून सूट दिली होती.2 / 10भारताने इराणच्या बंदर विकासासाठी कोट्यवधीची गुंतवणूक केली असून या बंदरामुळे भारत थेट रशियापर्यंत इंटरनॅशनल नॉर्थ आणि साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरशी जोडलेला आहे. भारताने मध्य आशियापर्यंत जाण्यासाठी या बंदराला विकसित करण्याचा निर्णय घेतल होता. तालिबान आणि भारत यांच्यात या बंदरासाठी मोठा करार झाला, त्यामुळे पाकिस्तानला धक्का बसला होता3 / 10यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने नोव्हेंबर २०१८ साली भारताला चाबहार बंदराबाबत भारताला सूट दिली होती. मात्र आता तीच सूट अमेरिकेने रोखली आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा भारत आढावा घेत आहे. इराणविरोधात दबाव वाढवण्याची रणनीती म्हणून चाबहार बंदराला निर्बंधातून दिली जाणारी सूट अमेरिकेने संपवण्याचा निर्णय घेतला असं बोलले जाते. 4 / 10इराणने आपली अणु महत्त्वाकांक्षा, क्षेपणास्त्र मोहिम आणि दहशतवादाला पाठिंबा देणे सोडून द्यावे अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारताच्या प्रादेशिक रणनीतीसाठी चाबहार बंदर खूप महत्वाचे आहे. पाकिस्तान आणि चीनच्या ग्वादर बंदराला प्रत्युत्तर म्हणून भारत हे बंदर विकसित करत आहे.5 / 10चाबहार बंदराच्या मदतीने भारत पाकिस्तानला बायपास करून मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि अगदी रशिया आणि युरोपशी सहज व्यापार करू शकतो. २०२४ मध्ये भारताने इराणसोबत १० वर्षांसाठी चाबहार बंदर चालवण्यासाठी करार केला. येथील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भारताने २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. 6 / 10या बंदराचं नियंत्रण २०१८ पासून इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेडकडून केले जात आहे. आता अमेरिकेच्या या पाऊलामुळे भारताच्या चाबहार बंदराच्या विकासाच्या कामावर परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारताच्या चाबहार बंदराच्या कामकाजाला आणि नियंत्रणाला मर्यादा येऊ शकतात. 7 / 10चाबहार बंदरामुळे मुंबई आणि युरेशियामधील अंतर आणि वेळ खूपच कमी झालं आहे. यामुळे जहाजांच्या वाहतुकीत ४३ टक्के वाढ झाली आहे असं भारताच्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे. आता अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आधीच इराणसोबतचा आपला व्यापार सतत घसरत आहे. त्यात चाबहारबाबत इराणने भारताविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. 8 / 10इस्रायलसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात इराणचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. या बंदराबाबत रशिया, इराण आणि भारत यांच्यातील मैत्री वाढत असताना अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. त्याच वेळी चीनने इराणमध्ये आपली हजेरी वाढवली आहे.9 / 10आंतरराष्ट्रीय व्यापारातील पाकिस्तानचा अडथळा दूर करण्यासाठी चाबहार हा भारतासाठी हुकमी एक्का आहे. विशेषत: भारताला रस्त्याने थेट युरोपशी जोडणाऱ्या इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरला या बंदराचा मोठा उपयोग होणार आहे. 10 / 10चाबहार बंदर भारतासाठी व्यापारी तसेच सामरिकदृष्ट्याही उपयुक्त आहे. २०१६ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी या बंदराच्या विकासाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.