भारताचा आक्रमक पवित्रा! ५० हजार जवान पोहोचले चिनी सीमेवर; व्यूहनीतीत अचानक मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 13:17 IST
1 / 10गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीला वर्ष उलटून गेलं आहे. या वर्षभराच्या कालावधीत भारत-चीन सीमेवर अनेकदा तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळाली. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. यानंतर आता भारतीय लष्करानं आपल्या रणनीती आमूलाग्र बदल केला आहे.2 / 10१९६२ मध्ये भारत आणि चीनचं युद्ध झालं. भारताचा मोठा पराभव झाला. मात्र तरीही भारतानं सामरिकदृष्ट्या सर्वाधिक लक्ष पाकिस्तानवर केंद्रीत केलं. आता यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. गलवानमध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारतानं आता व्यूहनीती बदलली आहे.3 / 10भारतानं कमीत कमी ५० हजार जवानांना चिनी सीमेवर तैनात केल्याचं वृत्त ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेनं दिलं आहे. भारतानं उचलेलं हे पाऊल ऐतिहासिक असल्याचं ब्लूमबर्गनं म्हटलं आहे. 4 / 10भारतानं गेल्या ४ महिन्यांत चिनी सीमेला लागून असलेल्या विविध भागांत सैन्याच्या तुकड्या आणि लढाऊ विमानं तैनात केल्याचं वृत्त चार वेगवेगळ्या सुत्रांच्या हवाल्यानं ब्लूमबर्गनं दिलं आहे. 5 / 10सध्याच्या घडीला चिनी सीमेवर दोन लाख भारतीय जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवानांची संख्या ४० टक्क्यांनी अधिक आहे. यावरून भारताची बदललेली व्यूहनीती लक्षात येईल.6 / 10गेल्या वर्षी १५ जूनला चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर हल्ला केला. एका बाजूला माघार घेण्याची तयारी दर्शवणाऱ्या चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या तुलनेत चीनकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली.7 / 10सीमेचं संरक्षण करण्यासाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी भारतीय जवान सीमावर्ती भागात तैनात असायचे. मात्र आता सीमावर्ती भागात मोठ्या संख्येनं जवान तैनात करत भारतानं प्रतिहल्ला करण्याची तयारी केली आहे. 8 / 10आता भारत चीनविरोधात ऑफेंसिव्ह डिफेन्स रणनीतीचा वापर करण्यास जराही मागेपुढे पाहणार नाही, अशी माहिती एका सुत्रानं दिली. त्याचाच एक भाग म्हणून जवानांना आणि हलक्या हॉवित्झर तोफांना एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात नेण्यासाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. 9 / 10पीपल्स लिबरेशन आर्मीनं नुकतंच तिबेटमधील सैनिकांना शिनजियांग मिलिट्री कमांडला आणलं आहे. भारतासोबतच्या वादग्रस्त भागाच्या टेहळणीची जबाबदारी याच कमांडवर आहे. चीनकडून सीमावर्ती भागात लढाऊ विमानांच्या धावपट्ट्या तयार करण्याचं, बॉम्बप्रूफ बंकर तयार करण्याचं काम सुरू आहे. 10 / 10भारतानं अचानक रणनीती बदलत सीमेवरील सैन्याची कुमक वाढवली आहे. त्यामुळे भारत आणि चीनमधील संघर्ष आणखी चिघळू शकतो. गेल्या वर्षभरात लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका होऊनही वाद मिटलेला नाही. त्यामुळे चिनी कुरापतींना अधिक आक्रमकपणे जोरदार प्रतिहल्ला करून उत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे.