Sharad Yadav Sad Demise: ज्योतिषाचा सल्ला, राजीव गांधींविरोधात निवडणूक, तुरुंगातच खासदार; शरद यादवांचा राजकीय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 11:21 IST
1 / 10भारताच्या राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज नेते आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यांनी त्यांच्या निधमाची माहिती दिली आहे. (Sharad Yadav Sad Demise)2 / 10शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती ट्विट करून दिली. त्यांनी लिहिले की, बाबा आता या जगामध्ये राहिले नाहीत. शरद यादव यांनी बिहार आणि राष्ट्रीय राजकारणामधील अनेक स्थित्यंतरे पाहिली होती. जेपी आंदोलनामधून पुढे आलेल्या नेत्यांपैकी ते एक नेते होते.3 / 10बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचा कार्यकाळ शरद यादव यांनी पाहिला होता. तसेच तिथे सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नितीश कुमार यांचे सरकार पाहिले होते. तसेच भाजपविरोधात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचेही ते साक्षीदार होते. वाजपेयींच्या नेतृत्वात एनडीए केंद्रात सत्तेत असताना महत्त्वाच्या नेत्यांपैकी शरद यादव हे एक होते.4 / 10शरद यादव यांच्या निधनाने राजकारणातील अजातशत्रू आणि समाजवादी विचारा खंदा पुरस्कर्ता नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गोल्ड मेडलिस्ट इंजिनीयर ते ११ वेळा खासदार असा शरद यादव यांचा प्रवास राहिला आहे. जयप्रकाश नारायण आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती.5 / 10शरद यादव यांचा जन्म मध्यप्रदेशचा. पण त्यांची कर्मभूमी बिहार आणि उत्तर प्रदेश राहिली. शरद यादव हे २५ वर्षांचे असताना खासदार झाले होते. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन पेटले होते. शरद यादव यांना मीसा कायद्यांतर्गत तुरुंगात टाकण्यात आले होते. सरदार सरोवर धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधातील आंदोलनामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. 6 / 10देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर शरद यादव दोनदा तुरुंगात गेले. त्यावेळी ते सर्वोदयी विचाराचे नेते दादा धर्माधिकारी यांच्या संपर्कात आले होते. दादा धर्माधिकारी हे जयप्रकाश नारायण यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. जबलपूरमधील रिक्त जागेवर शरद यादव यांना पीपल्स पार्टीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी शरद यादव तुरुंगात होते. 7 / 10१९७४ मध्ये जेपींनी शरद यादव यांना आपला पहिला उमेदवार म्हणून घोषित केले होते. या निवडणुकीत यादव एक लाखाहून अधिक मताने विजयी झाले होते. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर अमेठी लोकसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक झाली. त्यावेळी राजीव गांधी निवडणूक मैदानात होते. एका ज्योतिषाच्या सल्ल्याने चौधरी चरणसिंह यांनी शरद यादव यांना राजीव गांधींविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. 8 / 10या निवडणुकीत राजीव गांधी यांचा पराभव होईल. त्याचा थेट परिणाम केंद्र सरकारवर होईल, असे ज्योतिषाने नानाजी देशमुख आणि चौधरी चरणसिंह यांना सांगितले होते. त्यामुळेच यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र, या निवडणुकीत शरद यादव यांचा पराभव झाला होता, असा एक किस्सा सांगितला जातो.9 / 10सन १९९० मध्ये नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर लालूप्रसाद यादव हे काँग्रेसच्या बाजूने होते. शरद यादव यांनाही भाजपला पाठिंबा देणे मान्य नव्हते. मात्र रामविलास पासवान आणि इतर नेत्यांच्या सांगण्यावरून ते भाजपसोबत जाण्यास तयार झाले.10 / 10सन २०१३ मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना प्रचार समितीचे अध्यक्ष बनवले. त्यामुळे बिहारमध्ये जनता दलाने एनडीएतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. शरद यादव तेव्हा एनडीएचे संयोजक होते. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर एनडीएतून बाहेर पडण्यास शरद यादव राजी नव्हते. पण तरीही नितीश कुमार यांच्या हट्टामुळे त्यांना एनडीएतून बाहेर पडावे लागले.