शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine: मोदी सरकारचा मेगा प्लान! पुढील वर्षी ५ अब्ज कोरोना लसींचे उत्पादन करणार; निर्यातही वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 6:50 PM

1 / 12
कोरोनाचे संकट संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे सकारात्मक चित्र असतानाच आधी डेल्टा आणि त्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे.
2 / 12
ब्रिटननंतर अमेरिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर कोरोना विषाणू प्रतिबंधक लसच (Corona Vaccine) रामबाण उपाय असल्याचे सातत्याने सांगितले जात असून, नागरिकांनी लसी घ्यावी, असे आवाहनही केले जात आहे.
3 / 12
यातच आता केंद्रातील मोदी सरकारने एक मोठी योजना आखली असून, पुढील वर्षी कोरोना लसीचे ५ अब्ज डोसचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे सांगितले जात आहे.
4 / 12
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली. जगाला राहण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण बनवण्यासाठी भारत आपले योगदान देणे कायम ठेवणार आहे.
5 / 12
लसींचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक असलेल्या भारताने अन्य देशांना कोरोना लसींचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारताने कोरोना लसीची निर्यात बंद केली होती.
6 / 12
आपल्या देशातील लोकसंख्येचे लसीकरण करणे आणि उर्वरित जगाला लस पुरवणे या दोन्ही बाबती भारताने खूप चांगल्या पद्धतीने केल्या आहेत. तसेच दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत, याचे भारताने उत्तम उदाहरण घालून दिले आहे. आम्ही आधी निर्यात करत आलो आहोत. आताही निर्यात करत आहोत.
7 / 12
आम्ही सर्वांसाठी परवडणाऱ्या किमतीत लसी उपलब्ध करून देण्यासाठी अन्य देशांना आवश्यक तितक्या लसींचा पुरवठा करण्यास तयार आहोत, असे पीयूष गोयल यांनी नमूद केले. सीआयआय पार्टनरशिप समिट २०२१ च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
8 / 12
भारत देश अन्य राष्ट्रांसोबत मिळून त्यांना वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे पुरवण्यात मदत करण्यासाठी काम करत आहे आणि भारतालाही अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळाल्याचे पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले.
9 / 12
दरम्यान, पुणेस्थित लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येत्या सहा महिन्यांत मुलांसाठी कोरोना लस सुरू करण्याचा विचार करत आहे, असे कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले.
10 / 12
अदर पूनावाला यांनी म्हटले की, जी लस मुलांसाठी तयार केली जाईल. ती नोव्हावॅक्स या अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीची कोरोना लस आहे. कोव्होव्हॅक्स या नावाने कंपनी स्थानिक पातळीवर लस तयार करून उत्पादन करेल, असे त्यांनी सांगितले.
11 / 12
आम्ही मुलांमध्ये गंभीर आजार पाहिलेला नाही. सध्या मुलांची काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र, आम्ही त्यांच्यासाठी सहा महिन्यांत लस आणू. ही लस तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी उपलब्ध असावी, अशी अपेक्षा आहे.
12 / 12
आमच्या कोव्होव्हॅक्स लसीची चाचणी सुरू आहे. लसीने तीन वर्षांच्या वयोगटापर्यंत सर्व बाबतीत उत्कृष्ट डेटा दर्शविला आहे. ही लस येत्या सहा महिन्यांत लाँच होणार आहे, असे अदर पूनावाला म्हणाले. जगातील अनेक देशांमध्ये लहान मुलांना लस दिली जात आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCentral Governmentकेंद्र सरकारpiyush goyalपीयुष गोयल