शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 23:29 IST

1 / 6
सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असतानाच देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण आज जगदीप धनखड यांच्या कारकीर्दीवर थोडक्यात नजर टाकूया.
2 / 6
जगदीप धनखड यांचा जन्म राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील असलेल्या किठाणा या गावातील एका जाट शेतकरी कुटुंबात १८ मे १९५१ रोजी झाला होता. जगदीप धनखड यांना सैनिक स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. तर पुढे जयपूरमधील राजस्थान विद्यापीठामधून बीएसस्सी आणि एलएलबी ह्या पदव्या घेतल्या.
3 / 6
दरम्यान, राजस्थानमध्ये वकिली करत असताना १९८७ मध्ये त्यांची राजस्थान बार कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून निवड झाले. ते बार कौन्सिलचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले होते. त्यानंतर १९८९ मध्ये ते जनता दलाकडून निवडणूक लढवत झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले. तसेच त्यावेळी सत्तेत आलेल्या व्ही.पी. सिंह आणि पुढे सत्तेवर आलेल्या चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
4 / 6
मात्र १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून ते १९९३ मध्ये किशनगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार बनले. पण ते काँग्रेसमध्येही फार वर्षे टिकले नाहीत.
5 / 6
२००३ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामधील १६ वर्षाच्या कारकीर्दीनंतर २०१९ मध्ये जगदीप धनखड यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले. धनखड यांची बंगालचे राज्यपाल म्हणून कारकीर्द कमालीची वादग्रस्त ठरली. या काळात त्यांचे विविध मुद्द्यांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसोबत वाद झाले. या दरम्यान, दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले होते.
6 / 6
अखेरीस २०२२ मध्ये सत्ताधारी एनडीएने जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली. त्यावेळी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पराभूत करत जगदीप धनखड हे देशाचे उपराष्ट्रपदी बनले. उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेचं सभापतीपद सांभाळत अशताना धनखड यांचे विरोधी पक्षातील सदस्यांसोबत अनेकदा खटके उडाले. यादरम्यान, विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. अखेरीस आज धनखड यांनी आज प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला.
टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडIndiaभारतRajya Sabhaराज्यसभा