coronavirus: खुशखबर! स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ सुरक्षित, पहिल्या टप्प्यातील चाचणीत दिसला असा परिणाम
By बाळकृष्ण परब | Updated: December 17, 2020 10:01 IST
1 / 9संपत आलेल्या २०२० या संपूर्ण वर्षात कोरोना विषाणूच्या फैलावाने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. मात्र आता वर्षअखेरीस कोरोनाविरोधात काही सकारात्मक बातम्या येऊ लागल्या आहेत. 2 / 9आयसीएमआरच्या सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केलेली कोरोनाविरोधातील संपूर्ण स्वदेशी लस असलेल्या कोव्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहेत. 3 / 9कोव्हॅक्सिनने पहिल्या टप्प्यातील चाचणीदरम्यान, चांगले परिणाम दाखवले आहेत. तसेच ही लस घेणाऱ्या स्वयंसेवकांवर कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. 4 / 9परदेशस्थ पोर्टल मेडआरएक्सआयव्ही ने केलेल्या दाव्यानुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक आहे. तसेच लस घेणाऱ्या सर्व वयोगटातील स्वयंसेवकांवर कुठलेही परिणाम दिसून आलेले नाहीत.5 / 9 भारत बायोटेकच्या या लसीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी सप्टेंबर महिन्यात समाप्त झाली होती. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची लस ११ विविध रुग्णालयात ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. 6 / 9मेडआरएक्सआयव्ही वर उपलब्ध करण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार कोव्हॅक्सिनने स्वयंसेवकांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित करण्याचे काम केले आहे. तज्ज्ञांनी औपचारिकपणे संशोधनाच्या अहवालाचे मूल्यांकन करून पहिल्यांदाच ही माहिती मेडआरएक्सआयव्ही पोर्टलवर अपलोड केली आहे. 7 / 9लसीच्या प्रतिकूल परिणामाची एक घटना समोर आली होती. संबंधित स्वयंसेवकाला ३० जुलै रोजी लस देण्यात आली होती. पाच दिवसांनंतर त्याच्यामध्ये कोविड-१९ आणि सार्स-कोव्ह २ चा संसर्ग दिसून आला. संबंधित रुग्णाला १५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर २२ ऑगस्ट रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. 8 / 9 कोव्हॅक्सिन (बीबीव्ही १५२) च्या प्रभावाचे आकलन करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील क्लीनिकल ट्रायल घेण्यात आली होती. दरम्यान, बीबीव्ही १५२ लसीला दोन ते आठ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये ठेवण्यात आले होते, असा या लसीसंबंधीच्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसी याच तापमानामध्ये ठेवल्या जातात. 9 / 9दरम्यान, कोव्हॅक्सिनची लस दिल्यानंतर काही स्वयंसेवकांमध्ये सौम्य आणि मध्यम प्रकारचा परिणाम दिसून आला. मात्र ही लक्षणे आपोआप बरी झाली. त्यासाठी कुठल्या औषधाची आवश्यकता भासली नाही. दुसऱ्या डोसनंतरही हाच परिणाम दिसून आला.