शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्ष?; छत्रपती संभाजीराजेंचं सूचक विधान, सक्रीय राजकारणात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 11:50 AM

1 / 10
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी आगामी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं विधान केले होते. संभाजीराजे यांना २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टीने राष्ट्रपती कोट्यातून खासदार बनवले होते. तेव्हापासून ते राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत होते.
2 / 10
राज्यात मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला. आझाद मैदानावर उपोषण करत मराठा समाजाच्या विविध मागण्या ठेवल्या. संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्यातील जिल्हाजिल्ह्यात पुन्हा मराठा समाज एकजूट होऊ लागला. त्यानंतर संभाजीराजेंनी पुढील राजकीय दिशा निश्चित करण्याचं ठरवलं.
3 / 10
छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभा खासदारकीची टर्म आज (३मे) रोजी समाप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी सकाळी ट्विटर फोटो पोस्ट करीत एक सूचक विधान केलेले आहे. आजन्म विचारांशी बांधील असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
4 / 10
या फोटोमध्ये संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक वाचताना दिसत असून मागे छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मोठ्या तसबीरी आहेत. तसेच शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज, संभाजीराजे यांचे आजोबा मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज व वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांच्याही प्रतिमा या फोटोमध्ये दिसत आहेत.
5 / 10
या फोटो सोबत संभाजीराजे यांनी 'आजन्म विचारांशी बांधील' असेही म्हटले आहे. निश्चितच संभाजीराजे यांना ते आपल्या या पूर्वजांच्या विचारांशी बांधील आहेत, हेच म्हणायचे आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी आपली पुढची राजकीय दिशा ३ मे रोजी माझी टर्म संपल्यानंतर जाहीर करेन, असे सांगितले होते.
6 / 10
आज संभाजीराजे यांनी हा फोटो ट्विट करीत एक सूचक कल्पना दिली आहे का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अलीकडेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेसमध्ये यावेत, अशी इच्छा जाहीररित्या व्यक्त केली.
7 / 10
या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे हे ट्विट त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याचा एक सूचक अंदाज देणारे आहे. माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी लवकरच माझी भूमिका जाहीर करेन. राजकारणात उतरायचं हे निश्चित असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
8 / 10
तसेच दिल्ली असो वा महाराष्ट्र दोन्हीकडे माझा संपर्क वाढला आहे. दिल्लीतील लोकांचीही इच्छा आहे शिवशाहूचा वंशज पुन्हा यावा. यापुढे राजकारणात सक्रीय होणार आहे. ज्यावेळी मी खासदार झालो त्यावेळीही माझी भूमिका स्पष्ट होती असं त्यांनी सांगितले.
9 / 10
त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे. आज खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. ६ मे रोजी शंभू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. त्यानंतर लवकरच मी माझी भूमिका महाराष्ट्रात मांडेन असं त्यांनी सांगितले आहे.
10 / 10
संभाजीराजे हे राज्यसभेचे खासदार जरी भाजपा काळात झाले असले तरी त्यांनी आजतागायत कधीही थेट भाजपाच्या व्यासपीठावर अथवा पक्षाच्या बाजूने भूमिका घेतली नाही. समाजकारण करत त्यांनी अलीकडच्या काळात मराठा आरक्षणासाठी लढा उभारला. त्यामुळे संभाजीराजे हे नवा राजकीय पक्ष काढणार की अन्य कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती