CJI Uday Lalit: दिल्लीत दोन रुमची खोली, १०२ वर्षांचा वारसा! उदय लळीत असेच नाही सर्वोच्च स्थानी पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 12:18 IST
1 / 8देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपूत्र उदय लळीत यांची नियुक्ती झाली आहे. लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळीत यांना शपथ दिली. महाराष्ट्रासाठी आजचा आणखी एक सोनेरी दिवस उजाडला आहे. लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे सरन्यायाधीश आहेत. रमणा यांच्यापूर्वी नागपूरचे शरद बोबडे हे सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाचे ते ४९ वे सरन्यायाधीश आहेत. त्यांचा कार्यकाळ अवघा ७४ दिवसांचा असेल. पण त्यांचा हा प्रवास काही थोडा थोडका नाही तर १०२ वर्षांचा आहे. 2 / 8तिहेरी तलाकची पद्धती राज्यघटनाविरोधी आहे, असा ऐतिहासिक निर्णय पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने २०१७ मध्ये दिला होता. त्यात न्या. लळित यांचा समावेश होता. पॉक्सो कायद्यांतर्गत एका खटल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्या. लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने रद्द केला होता. केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाचे अधिकार त्रावणकोर येथील माजी संस्थानिकांच्या वंशजांना आहेत, असा महत्त्वपूर्ण निकाल न्या. लळित यांच्या खंडपीठाने दिला होता.3 / 8उदय लळीत यांचा कायदे क्षेत्रातील प्रचंड असा मोठा वारसा आहे. जवळपास १०२ वर्षांचा. त्यांचे आजोबा रंगनाथ लळीत हे स्वातंत्र्यापूर्वीपासून वकील होते. उमेश रंगनाथ ललित हे उदय यांचे वडील आज ९० वर्षांचे आहेत. महाराष्ट्रातील ते नामवंत वकील होते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. आज शपथविधीला लळीत यांच्या तीन पिढ्या उपस्थित होत्या. 4 / 8न्यायमूर्ती लळीत यांची पत्नी अमिता लळीत या नोएडा येथे एक शाळा चालवतात. लळीत यांना दोन मुलगे आहेत. हर्षद आणि श्रेयश अशी त्यांची नावे. दोघांनीही इंजिनिअरिंग केले आहे. श्रेयशने नंतर कायद्याचे शिक्षण घेतले. त्याची पत्नी म्हणजेच सरन्यायाधीशांची सून रवीना देखील वकील आहे. तर हर्षद हा शास्त्रज्ञ म्हणून काम करतो. तो आणि त्याची पत्नी राधिका अमेरिकेत असतात. 5 / 8न्या. उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. 6 / 8वर्गमित्र ॲड. भगवान वैद्य यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, आम्ही हरिभाईमध्ये एकत्र होतोच; पण दत्त चौकातील एक नंबर शाळेत आयाचित सरांच्या संस्कृत वर्गाला आणि लेले गुरुजींच्या क्लासला एकत्रच जायचो. शालेय जीवनात न्या. उदय हे अभ्यासात अत्यंत हुशार होते. प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करीत असत. घरातील परंपरेनुसार तेही कायद्याचे विद्यार्थी झाले आणि आज सरन्यायाधीश या सर्वोच्च पदावर ते पोहोचले, ही आनंदाची गोष्ट आहे. न्या. उदय हे सकाळी ९.३० वाजता न्यायालयात उपस्थित राहतात. वेळेबाबत ते अतिशय काटेकोर आहेत. कोर्टापुढे सध्या अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यांचा निपटारा लवकर व्हावा. यासाठी ते कोर्टात वेळेत पोहोचतात, असेही वैद्य यांनी सांगितले.7 / 8उदय लळीत यांचे नागपूरसोबत अगदी जवळचे संबंध आहेत. त्यांचे वडील उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. त्यामुळे त्यांनी बालपणीची काही वर्षे नागपूरमध्ये घालविली आहेत. नागपुरातील वरिष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, न्या. लळीत यांचे वडील १९७३ ते १९७५ या काळात उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होते. ते सिव्हिल लाईन्स येथील सौदामिनी बंगल्यामध्ये राहत होते. त्यावेळी न्या. उदय लळीत शालेय शिक्षण घेत होते.8 / 8लळीत हे १९८० मध्ये दिल्लीत आले. मुंबई उच्च न्यायालयातील वकीली थांबवून त्यांनी दिल्लीत वकीली सुरु केली. मयूर विहारमध्ये ते कामगार वर्गासोबत दोन खोल्यांच्या घरात राहत होते. फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी आपले नाव कमावले आणि सर्वोच्च न्यायालयातील एक निष्णात वकील बनले. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात देखील त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले.