तृतीयपंथी, TikTok, मेक्सिको-कॅनडा अन्... शपथ घेताच ट्रम्प यांचे १० मोठे निर्णय, ६वा भारतासाठी फायद्याचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:16 IST
1 / 12अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिकेने बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबतही सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ महामारी आणि इतर आंतरराष्ट्रीय आरोग्य संकटांना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचे म्हटलं.2 / 12ट्रम्प यांच्या आदेशानुसार,चीन नियंत्रित व्हिडिओ शॉर्ट शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकचे काम ७५ दिवसांसाठी वाढवण्यात आले आहे. म्हणजेच ही बंदी ७५ दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. जेणेकरून प्रशासनाला योग्य दिशा ठरवण्याची संधी मिळेल. 3 / 12राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बेकायदेशीर इमिग्रेशनवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. देशाच्या दक्षिण सीमेवर (म्हणजे मेक्सिकोच्या सीमेवर) आणीबाणी लागू करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. ट्रम्प प्रशासनाने सीबीपी वन नावाच्या बॉर्डर ॲपचा वापर देखील बंद केला आहे, ज्याने अंदाजे १० लाख लोकांना कायदेशीररित्या काम करण्याच्या पात्रतेसह अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यास मान्यता दिली होती.4 / 12अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की त्यांचे प्रशासन रंगविरहित आणि गुणवत्तेवर आधारित समाज निर्माण करेल. अमेरिकन सरकार यापुढे वंश आणि लिंगाशी संबंधित गोष्टींना प्राधान्य देणार नाही, असं ट्रम्प म्हणाले.5 / 12डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या पहिल्या कार्यकारी आदेशानुसार, अमेरिकन नागरिकांना समृद्ध करण्यासाठी परदेशी देशांवर शुल्क लादले जाईल. यामध्ये १ फेब्रुवारीपासून शेजारील देश कॅनडा आणि मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याची बाब महत्त्वाची मानली जात आहे. याआधी, ट्रम्प यांनी जाहीर केले होते की महसूल गोळा करण्यासाठी 'एक्सटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस' नावाची संस्था तयार करायची आहे.6 / 12नवीन अमेरिकन सरकारने ऊर्जा गरजा भागवण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषित केली आहे. आम्ही एक उत्पादन केंद्र बनू आणि संपूर्ण जगाला ऊर्जा निर्यात करू, असं ट्रम्प यांन म्हटलं आहे. एकंदरीत डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल आणि वायूचे जास्तीत जास्त उत्पादन करण्याची योजना आखली आहे. या निर्णयाचा मोठा फायदा भारताला होणार आहे कारण अमेरिकेकडून ही उत्पादने आयात करणारा आपला देश मोठा भागिदार आहे.7 / 12डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्ट्रिक वाहनांना लक्ष्य करणारा जो बायडेन यांचा आदेश रद्द केला आहे. २०३० पर्यंत अमेरिकेमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन वाहनांपैकी निम्मी वाहने इलेक्ट्रिक आहेत याची खात्री करण्यासाठी बायडेन यांनी प्रयत्न केला होता. मात्र ट्रम्प यांनी २०३५ पर्यंत शून्य उत्सर्जन वाहन नियम स्वीकारण्यासाठी राज्यांना दिलेली सूट संपवण्यास सांगितले आहे. तसेच, ईव्ही टॅक्स क्रेडिट रद्द करण्याबाबत विचार करण्याबाबत सांगण्यात आले आहे.8 / 12नवीन आदेशात शासकीय कार्यक्षमता विभागाची स्थापना नमूद करण्यात आली आहे. अमेरिकन सरकारच्या विनाकारण खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करणे आणि फेडरल ऑपरेशन्स सुव्यवस्थित करणे हा त्याचा उद्देश आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एलोन मस्क आणि विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी नेते म्हणून नियुक्त केले होते. मात्र, विवेक रामास्वामी यांनी यातून माघार घेतली.9 / 12सर्व सरकारी सेन्सॉरशिप थांबवण्याचाही या आदेशात उल्लेख आहे. अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत आणणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. मात्र, या आदेशावर टीकाकारांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. तसेच, पत्रकार, समीक्षक आणि राजकीय विरोधकांना धमकावण्याच्या आणि त्यांच्यावर खटला चालवण्याच्या त्याच्या मागील कृतींचा उल्लेख आहे.10 / 12अमेरिका पनामा कालवा परत घेईल असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्घाटनाच्या भाषणात १९व्या शतकातील विस्तारवादी सिद्धांताचाही उल्लेख केला. मात्र, ते कधी आणि कसे करायचे, याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली नाही.11 / 12अमेरिकेत आता तृतीयपंथींना शासकीय मान्यता नसणार असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेत फक्त पुरुष आणि महिलाया दोनच गटांना मान्यता असेल, असे आदेशात म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या नवीन अधिकाऱ्यांच्या मते, आतापासून जन्माच्या वेळी नियुक्त केलेले लिंग बदलले जाणार नाही. अशा स्थितीत अमेरिकेत तृतीयपंथीयांचे काय होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.12 / 12डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना माफ केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ या लोकांनी कॅपिटल हिलवर हल्ला केल्याचा आरोप आहे. सुमारे १,५९० आरोपींपैकी १४ वगळता सर्वांची शिक्षा रद्द केली जाईल, असे ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आले आहे.