By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 15:14 IST
1 / 12नेमेचि येतो पावसाळा अन् नेमेचि होते मुंबईची तुंबई. पाऊस येणं आणि मुंबई तुंबणं हे जणू समीकरणच. मुंबई तुंबल्यानं वाहतूक ठप्प होतेच. शिवाय अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं.2 / 12मुंबईची भौगोलिक रचना पाहिल्यास या शहराची मर्यादा संपली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे शहरावर अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळेच प्रत्येक पावसात मुंबई तुंबते. 3 / 12समुद्राच्या पाण्याची पातळीदेखील सातत्यानं उंचावत असल्यानं मुंबई, बँकाँगसारखी शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. ही समस्या दिवसागणिक वाढत असल्यानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 4 / 12काही वर्षांपूर्वी थायलंडदेखील अशाच समस्यांचा सामना करत होतं. मुसळधार पाऊस झाल्यानंतर संपूर्ण शहर पाण्याखाली जायचं. मात्र थायलंडनं एक वेगळाच पॅटर्न राबवला आणि पाण्याचं उत्तम व्यवस्थापन सुरू केलं. 5 / 12प्रसिद्ध वास्तुविद्याविशारद कोट्चाचॉर्न व्होराखॉम यांनी बांधकामात थोडे बदल करत पाण्याच्या व्यवस्थापनाची उत्तम योजना आखली. यामुळे पाणी तुंबण्याची समस्या तर दूर झालीच, सोबतच शहरातलं एक सुंदर प्रेक्षणीय ठिकाणदेखील तयार झालं. 6 / 12हावर्डमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या कोट्चाचॉर्न व्होराखॉम यांनी वातावरणात होणारे बदल, त्याचा शहरांवर होणारा परिणाम, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास करत पाण्याच्या व्यवस्थापनाचा सुंदर आणि कार्यक्षम पॅटर्न तयार केला. 7 / 12कोट्चाचॉर्न व्होराखॉम आणि त्यांची कंपनी लँडप्रोसेस यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या चुलालोंगकोर्न विद्यापीठ सेंटेनरी पार्कमध्ये पाणी साठवण्यासाठी एक जागा तयार केली.8 / 12कोट्चाचॉर्न व्होराखॉम यांनी विद्यापीठाच्या आवारात असलेल्या हिरवळीचा वापर मोठ्या खुबीनं केला. मोकळ्या जागेत उतरंड तयार करून तिथे पाणी साठून राहील, अशी व्यवस्था त्यांनी तयार केली. 9 / 12यामुळे पाणी गवतावर वाहून जाऊ लागलं. बरंचसं पाणी जमिनीत मुरू लागलं. जमिनीत न मुरलेलं पाणी उंतरडीच्या दिशेनं धावू लागतं. या साठलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापरदेखील करता येतो. 10 / 12पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर अशा प्रकारच्या उद्यानांमध्ये कोट्यवधी लीटर पाणी साठवता येतं. त्यामुळे शहरात पाणी साचत नाही. याशिवाय भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास साठवलेलं पाणी वापरात आणता येतं. 11 / 12२०११ मध्ये थायलंडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. पन्नास वर्षांतल्या सर्वात मोठ्या पुरानं थायलंडला झोडपून काढलं. यात जवळपास ८० जणांचा मृत्यू झाला. तर हजारो नागरिक विस्थापित झाले. 12 / 12थायलंडमधील ४० टक्के भूभाग २०३० पर्यंत पाण्याखाली जाऊ शकतो, अशी आकडेवारी त्यानंतर जागतिक बँकनं दिली. त्यानंतर पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी थायलंडनं प्रयत्न सुरू केले.