Russia-Ukraine war: रशियाला रोखणे सोपे नाही; पुतिनशी टक्कर घ्यायला का घाबरतात अमेरिका आणि नाटो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 19:15 IST
1 / 12 रशियाविरोधात युद्धात युक्रेन एकटा पडला आहे. युक्रेनच्या राजधानीपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर रशियन रणगाडे उभे आहेत. 96 तासांत राजधानी कीव रशियाच्या ताब्यात जाईल आणि आठवडाभरात युक्रेनचे सरकार पाडले जाईल, अशी भीती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना आहे.2 / 12 अशा स्थितीत प्रश्न पडतो की, या युद्धात अमेरिकेचे समर्थन असलेला युक्रेन इतका एकाकी का पडला? का नाटोच्या सदस्य देशांनी ऐनवेळी सैन्य पाठवण्यास नकार दिला? नाटोचे सदस्य देश आणि अमेरिका रशियाशी थेट सामना करण्यापासून का मागे हटत आहेत? ते थेट हल्ला करण्याऐवजी बैठका किंवा बोलण्यापुरते का मर्यादित आहेत?3 / 12 रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना टक्कर देणे कोणत्याही देशासाठी सोपे नाही, हे अमेरिकेलाही माहीत आहे. यामुळेच अमेरिकेने थेट युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवणार नसल्याचे सांगितले. असाच संदेश नाटोनेही दिला आहे. याचा अर्थ युक्रेनला हे युद्ध एकट्याने लढावे लागणार आहे.4 / 12 जेव्हा रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, सीमेवर सैन्य तैनात केले जात होते, तेव्हा अमेरिका सर्वात जास्त चिडली होती. युक्रेनवर हल्ला झाल्यास नाटोचे सदस्य देश मिळून रशियावर हल्ला करतील आणि त्याचे फार वाईट परिणाम होतील, असा इशारा बायडेन यांनी दिला होता.5 / 12 परंतु अमेरिकेच्या धमक्याचा रशियावर कुठलाही परिणाम झाला नाही आणि रशियाने या धमक्यांपासून मागे न हटता युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली. रशियाच्या या धडक कारवाईमुळेच रशियाशी थेट भिडण्यासाठी अमेरिका किंवा नाटोचा कोणताही सदस्य देश पुढे आला नाही.6 / 12 रशियावर थेट हल्ला करण्यापासून युरोपीय देश माघार घेत आहेत. या देशांचे रशियावरील अवलंबित्व हे त्याचे प्रमुख कारण आहे. युरोपीय देश मोठ्या प्रमाणावर ऊर्जेसाठी रशियावर अवलंबून आहेत. अनेक EU देश, जे NATO चे सदस्य देखील आहेत, त्यांना 40 टक्के नैसर्गिक वायूचा पुरवठा रशियाकडून होतो.7 / 12 अशा परिस्थितीत रशियाने गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवला तर युरोप मोठ्या ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर येईल. वीज आणि पेट्रोलियम पदार्थांची महागाई कंबरडे मोडू शकते, हे सर्व देशांना माहीत आहे. त्यामुळेच युरोपीय देश रशियाशी थेट मुकाबला करण्यास तयार होत नाहीत.8 / 12 रशियावर अमेरिका आणि इतर अनेक देशांकडून निर्बंध लादले जात आहेत, असे असूनही रशिया थांबायला तयार नाही. वास्तविक, रशियाने आपली शक्ती अशा प्रकारे वाढवली आहे की, या देशाला कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांचा फारसा फटका बसणार नाही. अमेरिका आणि नाटो देशांचा थेट हल्ला न करण्यामागे हेही एक कारण आहे.9 / 12 खरेतर, रशियाचा आंतरराष्ट्रीय चलन साठा जानेवारीमध्ये $630 अब्ज होता. विशेष म्हणजे यातील केवळ 16 टक्के रक्कम डॉलरच्या स्वरूपात ठेवली जाते. पाच वर्षांपूर्वी हे प्रमाण 40 टक्के होते. आर्थिकदृष्ट्या रशिया मजबूत स्थितीत असल्यामुळे त्याने नाटो किंवा अमेरिकेच्या धमक्यांना भीक घातली नाही.10 / 12 चीन हा आशियातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत रशिया आणि चीनमधील संबंध वाढले आहेत. हे अमेरिकेलाही माहीत आहे. अमेरिकेने चीनशी शत्रुत्व निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत रशियावर थेट हल्ला झाला तर त्याला चीनचा पाठिंबा नक्कीच मिळेल.11 / 12 रशिया हे सर्वाधिक अणुशक्ती असलेले राष्ट्र आहे, याशिवाय त्यांच्याकडे शस्त्रांचा मोठा साठा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाकडे जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक आहे. रशियाकडे आपल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाने कोणालाही ठेचून काढण्याची ताकद आहे. याच कारणामळे अनेक देश रशियाला घाबरतात.12 / 12 याशिवाय, युक्रेन आणि रशियाच्या अंतर्गत प्रकरणात कोणी ढवळाढवळ केली, तर त्याला इतिहासातील सर्वात वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुतीन यांनी आधीच दिलेला आहे. या सर्व गोष्टी अमेरिका आणि नाटोच्या सदस्य देशांना ठाऊक आहेत. त्यामुळेच हे देश पुतीन यांच्याशी थेट सामना करण्यास घाबरतात.