1 / 10पाकिस्तानातील आर्थिक संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पीठ, तांदूळ, दूध ते गॅस, पाणी, वीज या सर्व गोष्टींसाठी तेथील जनतेची तारेवरची कसरत सुरूच आहे. महागाईच्या बाबातीत आता पाकिस्ताननं श्रीलंकेलाही मागे टाकलंय. 2 / 10मागच्या वर्षी अशाच काही घटना खुद्द श्रीलंकेत दिसल्या होत्या, पण आता तिथे परिस्थिती सुधारताना दिसत आहे. तर पाकिस्तानचे लोक दिवसेंदिवस आणखी संकटात सापडताना दिसतायत. एप्रिल महिन्यात पाकिस्तानातील महागाईचा दर तब्बल ३६.४ टक्क्यांवर पोहोचला होता.3 / 10महागाई दराच्या बाबतीत, प्रत्येक महिन्यासह, पाकिस्तान (Pakistan Inflation Rate) सर्व देशांना मागे टाकत आहे. एप्रिलमध्ये महागाईचा दर ३६.४ टक्क्यांवर पोहोचला. आशियातील इतर देशांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. पाकिस्तान हा देश इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्याही मागे गेलाय.4 / 10मोठ्या अर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचा महागाई दर एप्रिलमध्ये ३५.३ टक्क्यांवर आला, जो मार्चमध्ये विक्रमी ५०.३ टक्के होता. त्यात झपाट्यानं घट झाली आहे. त्याचवेळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तानमध्ये महागाई सातत्याने वाढत आहे आणि जनतेवरील संकटही वाढत आहे.5 / 10दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला पाकिस्तान डिफॉल्ट होण्यापासून वाचण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) बेलआउट पॅकेजची वाट पाहत आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु देशाचे चलन कमकुवत होणं, खाद्यपदार्थांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि वीजेचे वाढते दर यामुळे महागाईचा दर नवीन पातळी गाठत आहे.6 / 10त्याला लगाम लावण्यात देशातील शाहबाज शरीफ सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येतोय. पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाच्या अंदाजावर नजर टाकली, तर पाकिस्तानी रुपयाची सततची घसरण आणि वाढत्या किंमती असूनही महागाईचा दर ३६-३८ टक्क्यांच्या दरम्यान राहणार असल्याचं म्हटलंय.7 / 10जागतिक स्तरावर, पाकिस्तानी रुपया आतापर्यंत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक आहे. केवळ २०२३ मध्ये, तो डॉलरच्या तुलनेत २० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. महागाईच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास एप्रिलमध्ये वाहतुकीच्या किमतीत ५६.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.8 / 10तर अन्नधान्याच्या महागाईत एप्रिलमध्ये ४८.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्या तुलनेत श्रीलंकेतील अन्नधान्याच्या किंमतीतील वाढीचा दर मार्चमध्ये ४७.६ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ३०.६ टक्क्यांवर आला आहे. श्रीलंकेत इतर महागाई वाढीचा दर ३७.६ टक्क्यांवर आला आहे, जो मार्च महिन्यात ५१.७ टक्क्यांच्या उच्चांकी पातळीवर होता.9 / 10आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून १.१ अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज जाहीर करण्याची मागणी पाकिस्तान सातत्याने करत आहे. परंतु अनेक कठोर अटी मान्य करूनही नाणेनिधीकडून अद्याप त्यास मान्यता मिळालेली नाही. देशाचे एकूण कर्ज आणि दायित्वे ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहेत. 10 / 10हे देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के आहे. त्याच वेळी, यापैकी सुमारे ३५ टक्के कर्ज हे केवळ चीनचे आहे, त्यात चीनच्या सरकारी बँकांच्या कर्जाचाही समावेश आहे. पाकिस्तानवर चीनचं ३० अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ते २५.१ अब्ज डॉलर्स होते.