CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली; 'या' देशांत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:21 IST
1 / 15कोरोनाचा जगभरात हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 328,969,289 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5,558,966 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. उपचारासानंतर अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगभरातील 267,803,699 लोक बरे झाले आहे. 3 / 15प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. 4 / 15ओमायक्रॉन संसर्गामुळे आता रुग्णालयांवर मोठा ताण येत आहे. युरोपीय देशांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणा सध्या संकटात असल्याचं पाहायला मिळत आहे. 5 / 15जागतिक आरोग्य संघटनेने याआधी आठवडाभरापूर्वी इशारा दिला होता की, आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न केल्यास रुग्णांची संख्या झपाट्याने वाढले तसेच रूग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.6 / 15WHO ने दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्व देशांपेक्षा मजबूत सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा असलेल्या फ्रान्स, ब्रिटन आणि स्पेनसारख्या देशांमध्ये देखील आता रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 7 / 15सोसायटी फॉर एक्युट मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. टिम कुक्सले यांनी युरोपमधील अनेक देशांतील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अतिशय खराब आहेत, जर अशा प्रकारे संसर्ग पसरला तर अशा संकटाला कसे तोंड द्यावे लागेल याचा विचार करणे भीतीदायक आहे असं म्हटलं आहे. 8 / 15एप्रिल 2020 मध्ये, WHO ने युरोपमधील देशांना त्यांच्या आरोग्य व्यवस्था सुधारण्याचा सल्ला दिला. मात्र त्यावेळी बहुतेक देशांना ते साथीच्या रोगासाठी तयार आहेत असं वाटलं होतं. कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. 9 / 15इराणमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झाल्याने देशात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीने ही माहिती दिली. इराणमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डिसेंबरमध्ये सापडला होता. 10 / 15टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार, देशाच्या आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी मोहम्मद हाशेमी यांनी ओमायक्रॉनच्या आणखी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे असं म्हटलं आहे. मात्र त्यांनी फारसा तपशील दिलेला नाही.11 / 15कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासून इराणमध्ये कोरोनाने 1,32,000 लोकांचा बळी घेतला आहे, गेल्या वर्षी 24 ऑगस्टला 709 जणांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या काही महिन्यांत लसीकरणामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.12 / 15फ्रान्सच्या स्ट्रासबर्ग हॉस्पिटलमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत की त्यांना इच्छा असूनही दाखल करता येत नाही. रुग्णालयातील 13,000 कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. 13 / 15काही रुग्णालयांमधील 20 टक्क्यांपर्यंत कर्मचारी संसर्गग्रस्त आहेत. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक गंभीर रुग्णांना उपचार नाकारावे लागले आहेत. फ्रान्सप्रमाणेच ब्रिटनमधील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. 14 / 15ब्रिटिश सरकारला लंडनमधील रुग्णालयांमध्ये सैन्य पाठवावे लागले, जेणेकरून रुग्णवाहिका, चाचणी आणि इतर गरजा भागवता येतील. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस कॉन्फेडरेशनच्या मते, सध्या 100,000 आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. 15 / 15कोरोमुळे रुग्णालयांवर खूप दबाव आहे, त्यामुळे असे अनेक रुग्ण आहेत, इंग्लंडमध्ये सुमारे 13,000 रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागली. 59 लाख लोकांना कॅन्सर स्क्रीनिंग, शस्त्रक्रिया करायच्या आहेत पण कोरोनामुळे ते प्रतीक्षा यादीत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.