शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    "US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"

    By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:09 IST

    1 / 10
    अमेरिका आणि इरान यांच्यात इस्लामाबाद येथे शांतता चर्चा सुरू झाली तेव्हा यातून काही ठोस निष्पन्न होईल अशी आशा सर्व जगाला होती. जवळपास २१ तास या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू होती त्यामुळे चर्चेतून सकारात्मक तोडगा निघेल असं वाटत होते परंतु रविवारी १२ एप्रिलला सकाळी अमेरिकन उपराष्ट्रपती जे.डी व्हान्स यांनी चर्चा संपल्याची घोषणा केली.
    2 / 10
    व्हान्स यांनी चर्चा संपली असून त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही असं जाहीर केले. अमेरिकेने दिलेल्या अटी मानण्यास इराणने नकार दिला असा आरोप व्हान्स यांनी केला. परंतु आता इराणने यावर वेगळाच दावा केला आहे. इस्रायलहून आलेल्या एका फोन कॉलमुळे चर्चा संपुष्टात आली असं इराणने म्हटलं आहे.
    3 / 10
    इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दावा केला की, चर्चेत इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जे.डी व्हान्स यांना एक कॉल केला होता. ज्यातून ही शांतता चर्चा फिस्कटली. इराण चांगल्या भावनेने इस्लामाबादमधील चर्चेत सहभागी झाला होता असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय व्हान्स यांना पाकिस्तानातून निघण्यापूर्वी पत्रकार घेणे अत्यावश्यक नव्हते असंही त्यांनी सांगितले. नेतन्याहू यांच्या कॉलबाबत वॉशिंग्टनने पुष्टी केली नाही.
    4 / 10
    शांतता चर्चेच्या बैठकीत व्हान्स यांना नेतन्याहू यांनी कॉल केला होता. त्यामुळे अमेरिका आणि इराण चर्चेतून लक्ष विचलित होऊन इस्रायली हितांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. जे युद्धातून मिळवले नाही तर शांतता चर्चेतून मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता असंही इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे.
    5 / 10
    इतकेच नाही तर संभाव्य इस्लामाबाद करार जवळपास तयार झाला होता. अमेरिका आणि इराण दोन्ही पक्ष अंतिम सहमतीजवळ पोहचले होते. या परिस्थितीत २१ तास सखोल चर्चा आणि वाटाघाटींमध्ये कुठलाही करार न होताच बैठक संपली असंही अराघची यांनी आरोप केला. चर्चेवेळी जर अटींमध्ये सातत्याने बदल केले नसते तर हा करार शक्य झाला असता असंही अराघची यांनी म्हटलं.
    6 / 10
    गेल्या ४७ वर्षात सर्वात उच्च पातळीवर झालेल्या सखोल चर्चेत इराणने युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेसोबत चांगल्या हेतूने संवाद साधला. परंतु जेव्हा इस्लामाबाद MOU काहीच अंतरावर होता तेव्हा आम्हाला गोलपोस्ट बदलणे आणि ब्लॉकेडचा सामना करावा लागला. चांगल्या भावनेतून चांगले होते, शत्रूत्वातून शत्रुत्व उभे राहते असं इराणने सांगितले.
    7 / 10
    इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावरून की दोन्ही पक्ष करार अंतिम करण्यापासून फक्त काही पावले दूर होते हे दिसून येते. अंतिम टप्प्यात तणाव तीव्रतेने वाढण्यापूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा यशाच्या किती जवळ आली होती हे यातून कळते. तर जर वॉशिंग्टनने आपला दृष्टिकोन बदलला तर अमेरिकेसोबत राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता अजूनही आहे असं इराणी राष्ट्रपती मसूद पेझेश्कियन यांनी म्हटलं.
    8 / 10
    इराणी राष्ट्रपतींनी अमेरिकेला आपली 'हुकूमशाही' वृत्ती सोडून इराणच्या हक्कांचा आदर करण्याचं आवाहन केले. या बदलामुळे कराराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हुकूमशाही ही एक अशी राजकीय व्यवस्था आहे, ज्यात शासन सार्वजनिक आणि खाजगी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर संपूर्ण नियंत्रण ठेवते. ट्रम्प यांनी आपलं वर्चस्ववादी धोरण सोडले, इराणी जनतेचा सन्मान राखला तर यातून नक्कीच मार्ग निघेल असं मसूद पेझेश्कियन यांनी सांगितले आहे.
    9 / 10
    दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील संघर्षामुळे जगातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग होर्मुझची सामुद्रधुनी सध्या धोक्याच्या छायेत आहे. इराणने या मार्गावर पसरलेले संभाव्य सुरुंग हटवण्यासाठी अमेरिकेने आता एक मोठी हायटेक लष्करी मोहीम सुरू केली आहे.
    10 / 10
    होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील २० टक्के तेल आणि गॅस पुरवठ्याचा मुख्य मार्ग आहे. सध्या या संघर्षात सुमारे ८०० मालवाहू जहाजे आणि तेल टँकर्स तिथे अडकले आहेत. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. त्यात अमेरिकेने नाकेबंदी करण्याची घोषणा केल्याने हा तणाव आणखी वाढणार आहे.
    टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरPakistanपाकिस्तानIsraelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIranइराण