लहानपणी प्रत्येकाची चॉकलेटचा बंगला असावा, कँडी-बिस्किटांनी त्याच्या खिडक्या सजलेल्या असाव्यात, अशी फँटसी असते. 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्ट्री' चित्रपटासारखे खऱ्या आयुष्यातही चॉकेलटच्या घराची कल्पनाच किती सुंदर आहे. आता ही फँटसी सत्यात उतरविण्याची कल्पना दोन आर्टिस्टने जरा जास्तच मनावर घेतली आणि त्यातून निर्माण केले संपूर्णत: केकपासून बनविलेले विशाल घर. फरशीपासून ते छतापर्यंत सात हजार स्क्वेअर फूटचे भव्य घर केकपासून तयार करण्यात आले आहे.कोणालाही राहावे वाटेल असे हे घर किथ मॅग्रुडर आणि स्कॉट होव्ह यांनी तयार केले आहे. या घराचे त्यांनी 'ब्रेक बे्रड एल. ए.' असे नामकरण केले आहे. लॉस एंजेलिस येथील थिंक टँक गॅलरीमध्ये सर्वांना पाहण्यासाठी ते खुले आहे. केकच्या भिंतीमध्ये फिरताण्याचा अनुभव नक्कीच स्वप्नवत असणार यात काही शंका नाही. मागच्या वर्षी होव्हने बँक्सीशी मिळून 'डिस्मललँड' आर्ट प्रोजेक्ट पूर्ण केला होता.केक बरोबरच या घरामध्ये काही विलक्षण आणि विचित्र वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. याविषयी होव्ह सांगतो की, 'केकच्या गोडव्या बरोबरच मी जीवनातील कटू सत्य दर्शविण्यासाठी हिंसेचे प्रतीक म्हणून कोयते, चित्त्याचे पंजे, कोल्याचे दात अशा वस्तू घरात इन्स्टॉल केल्या आहेत. प्लॅस्टिकपासून बनलेल्या वस्तू पाहताच क्षणी मनावर खोलवर परिणाम होतो.