शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Verghese Kurien: स्वत: दूध पित नव्हते, पण देशात दूधाचे पाट वाहविले; भारताच्या मिल्कमॅनची आज पुण्यतिथी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 12:57 PM

1 / 7
जगातील सर्वात लोकप्रिय दुधाचा ब्रँड कोणता? अमूल. या अमूलचा व्यवसाय आज अब्जावधींमध्ये आहे. या अमूलने फक्त गुजरातच्याच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांचे नशीब बदलले. करोडो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. एकेकाळी दुधासाठी तरसणाऱ्या आपल्या देशाला दुग्ध क्रांतीकडे नेले. आता देशात कधीच दुधाची टंचाई जाणवत नाही. अर्थात याला अमूलच नाही तर अनेक छोटे मोठे दूध उत्पादक संघांचा हातभार आहे. परंतू या सर्वांना दिशा दाखविणारा अमूल हा सर्वात मोठा ब्रँड आहे.
2 / 7
अमूलचे आपण जे नाव ऐकतो, त्या ब्रँडची स्थापना कोणी केली? आज त्यांची पुण्यतीथी आहे. वर्गीज कुरियन यांना अमूलची सुरुवात केली होती. दहा वर्षांपूर्वी गुजरातच्या नाडियाडमध्ये त्यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. कुरियन हे देशातील सर्वात मोठ्या दुग्धजन्य पदार्थ ब्रँड अमूल (AMUL) चे संस्थापक आहेत. आज त्यांच्यामुळेच देश दुग्धजन्य पदार्थांच्या बाबत समृद्ध आहे.
3 / 7
1945-46 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी दुधासाठी सहकारी योजनेचा पाया रचला. त्यानंतर 1946 मध्ये सहकारी संस्था म्हणून नोंदणी झाली. कुरियन यांनी १९४९ मध्ये अमूल डेअरी सुरू केली. यानंतर इतिहासाच्या पानांवर या डेअरीने दुग्ध क्रांतीची स्वप्ने कोरली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी अन्नधान्याचा तुटवडा होता, तसेच दूध उत्पादनाची स्थितीही अत्यंत वाईट होती. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याचे काम सुरू झाले. यामुळे त्यांना 'मिल्कमॅन ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखले जाते.
4 / 7
त्रिभुवन भाई पटेल यांच्यासोबत त्यांनी खेडा जिल्हा सहकारी संस्था सुरू केली. 1949 मध्ये त्यांनी गुजरातमधील दोन गावांना सभासद करून डेअरी को-ऑपरेटिव्ह फेडरेशनची स्थापना केली. म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करणारे कुरियन हे जगातील पहिले व्यक्ती होते. त्यापूर्वी गायीच्या दुधापासून पावडर बनवली जायची.
5 / 7
अमूलने एकदम हजारो लीटर दूध घेण्यास आणि विकण्यास सुरुवात केली नाही. सुरुवातीला २५० लीटर दुधावरच प्रक्रिया केली जायची. आता एकूण ७.६४ लाख सदस्य आहेत. कंपनी दररोज 33 लाख लीटर दूध संकलन करते. दररोज 50 लाख लीटर दूधावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे जगातील दूध उत्पादनात कंपनीचा वाटा १.२ टक्के आहे.
6 / 7
1960 च्या दशकात भारतातील दुधाचे उत्पादन 20 दशलक्ष टन होते. कुरियन यांच्या कार्यकाळात ते २०११ पर्यंत १२.२ कोटी टनांवर जाऊन पोहोचले. दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात देखील कुरियन यांनी पुढाकार घेतला होता. परंतू त्यापूर्वी त्यांनी देशाची दुधाची तहान भागविली. म्हशीच्या दुधाची पावडर देशवासियांपर्यंत पोहोचविली.
7 / 7
तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अमूलचे यश पाहून या मॉडेलचा देशभरात प्रसार करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला. राष्ट्रीय दूध विकास मंडळाची स्थापना केली, त्याचे अध्यक्षपद कुरियन यांना दिले. 1970 मध्ये 'ऑपरेशन फ्लड' सुरू केले, ज्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक बनला. कुरियान थोडी थोडकी नव्हे तर ३३ वर्षे या मंडळाच्या अध्यक्षपदावर होते. आश्चर्याचा धक्का देणारी बाब म्हणजे, कुरियन स्वत: दूध पित नव्हते. ते त्याचे कारणही सांगायचे, दूध मला आवडत नाही...
टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा