ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:49 IST
1 / 8आयसीआयसीआय बँकेनं आता यू टर्न घेतला आहे. बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी बचत खात्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याशी संबंधित आहेत. मेट्रो आणि शहरी भागात नवीन बचत खाते उघडण्यासाठी बँकेनं किमान मासिक सरासरी शिल्लक (एमएबी) अट ५० हजार रुपयांवरुन कमी करण्यात आली आहे.2 / 8बँकेनं आता अकाऊंटमध्ये किमान मासिक सरासरी शिल्लक रक्कम १५,००० रुपयांपर्यंत कमी केली आहे. हा नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू आहे. लोकांची नाराजी पाहून बँकेनं माघार घेतल्याचं म्हटलं जातंय. बँकेनं शहरी ग्राहकांसाठी मिनिमम बॅलन्सची अट अचानक वाढवून ५०,००० रुपये केली होती. यासोबतच बँकेने काही सेवांवरील शुल्कातही बदल केला आहे.3 / 8आयसीआयसीआय बँकेनं ग्राहकांची सोय लक्षात घेऊन बचत खात्याच्या नियमांमध्ये बदल केलाय. हे नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होतील. मेट्रो आणि शहरी भागात उघडण्यात आलेल्या नवीन खात्यांसाठी एमएबी आता १५,००० रुपये असेल. निमशहरी भागासाठी तो साडेसात हजार रुपये ठेवण्यात आला आहे. तर ग्रामीण भागासाठी ते अडीच हजार रुपये असेल.4 / 8काही लोकांना एमएबीमधून सूट देण्यात आली आहे. यामध्ये ६० वर्षांखालील पेन्शनधारक आणि १,२०० निवडक संस्थांचे विद्यार्थी यांचा समावेश आहे. या लोकांना खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हे नवीन नियम सॅलरी अकाऊंट, ज्येष्ठ नागरिक खाती, बेसिक सेव्हिंग अकाऊंट्स किंवा विशेष गरजा असलेल्या व्यक्तींच्या खात्यांना लागू होणार नाहीत. याचा अर्थ असा की या खात्यांसाठी एमएबीची आवश्यकता पूर्वीसारखीच राहील.5 / 8उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाला १५,००० रुपयांचा एमएबी ठेवावा लागेल. परंतु, त्याच्या खात्यात फक्त १०,००० रुपये असतील तर त्याला ५,००० रुपयांच्या रकमेसाठी शुल्क भरावं लागेल. या प्रकरणात, शुल्क ५,००० रुपयांच्या ६% म्हणजेच ३०० रुपये असेल. ३०० रुपये ५०० रुपयांपेक्षा कमी असल्यानं, ग्राहकाला ३०० रुपये शुल्क भरावे लागेल.6 / 8'आम्ही १ ऑगस्ट २०२५ पासून उघडण्यात आलेल्या नवीन बचत खात्यांसाठी नवीन मासिक सरासरी शिल्लक रकमेसाठी निवेदन जारी केलं होतं. आमच्या ग्राहकांच्या मौल्यवान अभिप्रायानंतर, आम्ही त्यांच्या अपेक्षा आणि प्राधान्यं अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी यामध्ये सुधारणा केल्या आहेत,' असं बँकेनं म्हटलंय. म्हणजेच बँकेनं ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्या गरजेनुसार नियम बदलले.7 / 8एमएबीची गणना कशी केली जाते? मिनिमम एव्हरेज बॅलन्स (एमएबी) कॅलेंडर महिन्यासाठी दिवसाच्या शेवटी शिल्लक रकमेची सरासरी म्हणून मोजली जाते. याचा अर्थ असा की बँक दररोज आपल्या खात्यात असलेली रक्कम जोडते आणि नंतर महिन्याच्या दिवसांच्या संख्येनं त्याची विभागणी करते. 8 / 8यापूर्वी आयसीआयसीआय बँकेनं १ ऑगस्ट २०२५ किंवा त्यानंतर उघडलेल्या बचत खात्यांसाठी शाखेच्या स्थानानुसार एमएबीच्या अटींमध्ये बदल केला होता. त्यावेळी मेट्रो आणि शहरी शाखांच्या ग्राहकांना ५० हजार रुपये, निमशहरी शाखांच्या ग्राहकांना २५ हजार रुपये आणि ग्रामीण शाखांच्या खातेदारांना १० हजार रुपये एमएबी ठेवण्यास सांगण्यात आलं होतं.