टॅरिफचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उलटणार? या ५ गोष्टींनी अमेरिकेलाच मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:19 IST
1 / 7डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यांनी केवळ चीन, मेक्सिको, कॅनडा या देशांवरच नव्हे तर भारतावरही शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, हा निर्णय अमेरिकेच्याच विरोधात जात असलेले समोर येत आहे.2 / 7डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतही कडाडून विरोध होत असून राजकीय वर्तुळापासून ते बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांकडूनच टीका होत आहे. अमेरिकन गुंतवणूकदार आणि जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक वॉरन बफे यांनी ट्रम्प टॅरिफवर बोलताना याला एक प्रकारचे युद्ध म्हटले आहे. तर दुसरीकडे मस्क यांच्याविरोधात अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.3 / 7ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर डॉलरमध्ये घसरण सुरू झाली आहे. जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य मोजणारा डॉलर निर्देशांक १०५.७ पर्यंत घसरला. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची मंद गती आणि ट्रम्प शुल्काच्या प्रतिसादात अनेक देशांनी जाहीर केलेले रेसिप्रोकल टॅरिफचा डॉलरवर परिणाम झाला आहे. गेल्या आठवडाभरात अमेरिकन डॉलरच्या दरात सुमारे दीड टक्क्यांनी घसरण झाली आहे.4 / 7देशांतर्गत उत्पादन वाढवणारा आणि रोजगाराला चालना देण्यासाठी रेसिप्रोकल टॅरिफचा निर्णय घेतल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. प्रत्यक्षात अमेरिकन शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटत असून गेल्या काही दिवसांपासून घसरणीचा ट्रेंड सुरूच आहे.5 / 7कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ७०.८५ डॉलरपर्यंत घसरली आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल ६७.७४ डॉलरवर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती घसरण्यामागे अनेक कारणे आहेत. अमेरिकन दर देखील त्यापैकी एक आहे. व्यापार युद्धामुळे व्यापारावर परिणाम होण्याची भीती आणि बाजारातील अनिश्चिततेचा परिणाम क्रूडच्या किमतीवरही दिसून येत आहे.6 / 7ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रत्युत्तरात, कॅनडाने अमेरिकन वस्तूंवर २५% शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. मेक्सिकोनेही रविवारी याबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली. चीननेही लगेच प्रतिसाद दिला आणि अमेरिकन आयातीवर १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू करण्याची घोषणा केली, जी १० मार्चपासून लागू होईल. एवढेच नाही तर चीनने २५ अमेरिकन कंपन्यांवर निर्यात-आयात बंदीही घातली आहे.7 / 7ट्रम्प यांच्या घोषणेचा भारतीय बाजारावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. उलट सेन्सेक्स-निफ्टी जोरदार गतीने उघडले आणि ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. भारतीय शेअर बाजारात भीतीऐवजी हिरवळ दिसून येत आहे. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण यांचा समावेश आहे.