शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:09 IST

1 / 7
America Donald Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी एका देशावर २५% आणि भारत व ब्राझीलसारख्या देशांवर ५०% चा उच्च टॅरिफ लावला आहे, परंतु त्यांचं हे पाऊल स्वतः अमेरिकेसाठीच अडचणीचं ठरत आहे. जगभरातील अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे.
2 / 7
आता IMF च्या माजी मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनीही यावरुन टीकेचा बाण सोडलाय. त्यांनी म्हटलंय की, अमेरिकेच्या टॅरिफनंतर सहा महिने उलटूनही त्याचा कोणताही विशेष परिणाम दिसून आला नाही आणि अमेरिकेमध्ये जो महसूल वाढला आहे, तो स्वतः अमेरिकन जनता आणि येथील कंपन्यांकडूनच वसूल केला गेला आहे.
3 / 7
ट्रम्पच्या टॅरिफमुळे जगात व्यापार युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग ती चीनसोबतच्या व्यापार युद्धाची गोष्ट असो, किंवा ब्राझीलसारख्या देशांची. भारताच्या बाबतीत पाहिल्यास, ट्रम्प यांनी आधी २५% टॅरिफची घोषणा केली आणि नंतर रशियन तेल खरेदीचा मुद्दा बनवत तो दुपटीने वाढवून ५०% केला.
4 / 7
पण जगातल्या विविध देशांवर टॅरिफ लावून अमेरिकेने नेमके काय मिळवलं? यावर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्र प्राध्यापिका आणि भारतीय वंशाच्या असलेल्या गीता गोपीनाथ यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली. याचा नकारात्मक परिणाम स्वतः अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरच झाल्याचे त्या म्हणाल्या.
5 / 7
गीता गोपीनाथ यांनी त्यांच्या 'X' पोस्टमध्ये म्हटलंय की, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा करून सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे, परंतु याचा कोणताही विशेष परिणाम झाला नाही. 'अमेरिकेच्या टॅरिफमधून काय साध्य झालं? सरकारसाठी महसूल वाढला का? हो, खूप वाढला, पण हे पैसे जवळजवळ पूर्णपणे अमेरिकन कंपन्यांकडूनच वसूल केले गेले आणि काही प्रमाणात त्याची भरपाई अमेरिकन ग्राहकांकडून करण्यात आली. एकूणच ट्रम्पचा टॅरिफ त्यांच्यासाठी एक प्रकारचा कर ठरला आहे.'
6 / 7
गीता गोपीनाथ यांनी टॅरिफवर टीका करताना म्हटले की, हे थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी एक नकारात्मक स्कोअरकार्ड राहिलं आहे. भारत आणि ब्राझीलमधून होणाऱ्या आयातीवर ५०% पर्यंत, आणि काही भारतीय औषधांवर तर १००% पर्यंत टॅरिफ लावला गेला होता, ज्याचा उद्देश देशांतर्गत उत्पादन वाढवणं आणि व्यापार संतुलनात सुधारणा करणे हा होता. परंतु याचा अमेरिकेला खूप कमी किंवा कोणताही आर्थिक लाभ झाला नाही. व्यापार संतुलनातही सुधारणा झाली नाही, तसंच अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रातही याचे कोणतेही सकारात्मक संकेत मिळालेले नसल्याचेही त्या म्हणाल्या.
7 / 7
टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई दरावर काय परिणाम झाला, यावर गीता गोपीनाथ यांनी सांगितलं की, ते लागू झाल्यानंतर देशात महागाईत थोडी वाढ दिसून आली आहे. विशेषतः घरगुती उपकरणं, फर्निचर, कॉफी यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढल्याचं दिसून आलं आहे. केवळ गोपीनाथच नाही, तर जगभरातील अनेक तज्ज्ञांनी ट्रम्पच्या टॅरिफवर टीका केली आहे आणि हा निर्णय स्वतः अमेरिकेसाठी वाईट असल्याचं म्हटलं आहे.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पTrade Tariff Warटॅरिफ युद्धEconomyअर्थव्यवस्था