शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई

By जयदीप दाभोळकर | Updated: April 17, 2025 08:48 IST

1 / 7
भारतीय बाजार नियामक सेबी (SEBI) जेनसोल इंजिनीअरिंगचे प्रवर्तक अनमोलसिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावर कारवाई केली आहे. सेबीने या दोघांनाही कंपनीत संचालक होण्यास आणि शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. त्यांनी कंपनीच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सेबीनं कंपनीच्या शेअर्स स्प्लिट करण्याच्या योजनेलाही स्थगिती दिलीये. तर दुसरीकडे अनमोल सिंग जग्गी यांची लक्झरी लाईफ समोर येत आहे.
2 / 7
सेबीनं यासंदर्भात मोठा खुलासा केलाय. सेबीच्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, अनमोल सिंग जग्गीने कंपनीच्या कर्जाच्या पैशातून गुरुग्राममध्ये एक महागडा फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट 'द कॅमेलियास' नावाच्या पॉश ठिकाणी आहे. सेबीच्या आदेशानुसार अनमोलसिंग जग्गी यांनी एका कार डीलरमार्फत पैसे वळवले. मग त्या पैशांतून त्यानी आपल्याच एका कंपनीशी संबंधित व्यक्तीला पैसे दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने या पैशांचा वापर फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला. केवळ अपार्टमेंटच नाही तर अशी अनेक माहिती समोर आली आहे ज्यावरून जग्गी किती लक्झरी आयुष्य जगत होते हे दिसून येतं.
3 / 7
सेबीनं दिलेल्या वृत्तानुसार जेनसोलनं इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) खरेदी करण्यासाठी इरेडाकडून ७१.४१ कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. इरेडा ही सरकारी एनबीएफसी कंपनी आहे. रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पांसाठी (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इ.) कर्ज पुरवठा करते. या कर्जानंतर जेनसोल कंपनीनं आपल्या खात्यातून २६ कोटी रुपये जोडले. अशा प्रकारे एकूण ९७ कोटी रुपये झाले. त्यानंतर काही दिवसांनी हे पैसे गो ऑटो नावाच्या कार डीलरकडे ट्रान्सफर करण्यात आले. हा कार डीलर कंपनीशी संबंधित होता. त्याच दिवशी गोऑटोनं कॅपब्रिज व्हेंचर्स नावाच्या कंपनीला ५० कोटी रुपये हस्तांतरित केले. ही कंपनी जेनसोलचे प्रवर्तक चालवतात.
4 / 7
त्यानंतर कॅपब्रिज व्हेंचर्सनं डीएलएफला सुमारे ४२.९४ कोटी रुपये दिले. 'द कॅमेलियास' प्रकल्पातील फ्लॅट खरेदीसाठी हे पैसे देण्यात आल्याचे सेबीनं म्हटलं आहे. म्हणजेच कंपनीने कर्जाच्या पैशातून स्वत:च्या प्रवर्तकासाठी महागडे अपार्टमेंट विकत घेतले. जग्गी यांनी लक्झरी लाईफवरही बराच पैसा खर्च केल्याचे सेबीच्या कागदपत्रांतून समोर आलं आहे. सेबीने दिलेल्या माहितीनुसार, जग्गी यांच्याकडे १.८६ कोटी रुपये किमतीचे दिरहम होते. त्याचवेळी त्यांनी २६ लाख रुपये किमतीचे गोल्फ गिअर (गोल्फ खेळण्यासाठी सर्व उपकरणे असलेले गोल्फ किट) खरेदी केलं आणि स्पामध्ये लाखो रुपये खर्च केले.
5 / 7
सेबीच्या कागदपत्रांनुसार, अनमोल सिंग जग्गी यांनी ब्लूस्मार्टच्या कंपनीचा सुमारे २५.७६ कोटी रुपयांचा निधी वैयक्तिक आणि कौटुंबिक वापरासाठी वळवला. यात क्रेडिट कार्ड, स्पा सेशन, घड्याळं, गोल्फ सेट आणि इतर गोष्टींवर अवाजवी खर्चाचा समावेश आहे. इतकंच नाही तर पर्सनल ट्रॅव्हलसाठी त्यांनी मेक माय ट्रिपवर ३ लाख रुपये खर्च केले आहेत. जेनसोल इंजिनीअरिंग ही ब्लूस्मार्टची मूळ कंपनी आहे. ब्लूस्मार्ट कॅब अनेक शहरांमध्ये विमानतळाहून पिकअप आणि ड्रॉप ऑफ ऑफर करते.
6 / 7
सेबी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. त्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करण्यात येणार आहे. हा ऑडिटर कंपनी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या खात्यांची तपासणी करेल. सेबीचे पूर्णवेळ सदस्य अश्विनी भाटिया यांनी आपल्या आदेशात म्हटलंय की, अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांनी कंपनीच्या पैशांचा गैरवापर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या पैशांचा थेट फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितलं.
7 / 7
सेबीच्या या कारवाईनंतर बुधवारी जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअरमध्ये घसरण झाली. बुधवारी या शेअरनं पाच टक्क्यांचा नीचांकी स्तर गाठला. या घसरणीनंतर या शेअरची किंमत १२३.६५ रुपयांवर आली आहे. तर एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी शेअर १३०.१५ रुपयांवर बंद झाला. येत्या काळात त्याचा शेअर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टॅग्स :businessव्यवसायSEBIसेबी