शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solar Eclipse 2021: सर्वांत पहिल्यांदा सूर्यग्रहण कधी आणि कसं घडलं? वाचा, रंजक कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 20:06 IST

1 / 13
वास्तविक पाहता सूर्यग्रहण ही पूर्णपणे खगोलीय घटना असली, तरी धार्मिकदृष्ट्या याला अधिक महत्त्व आहे. सूर्यग्रहणावेळी काय करावे आणि काय करू नये, याचे वर्णन आपल्याला धर्मशास्त्रांमध्ये आढळून येते.
2 / 13
शास्त्रांमध्ये सूर्यग्रहणावेळी पाळावयाचे काही नियमही सांगितलेले आढळून येतात. सन २०२१ मध्ये दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. पैकी पहिले सूर्यग्रहण १० जून २०२१ रोजी लागणार आहे.
3 / 13
सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधे चंद्र आला की, सूर्यग्रहण होते. ब्रह्मांडाची निर्मिती ही सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात. सूर्यमाला तयार झाल्यानंतर लाखों वर्षानंतर ग्रहांना पूर्ण आकार आला.
4 / 13
ते सूर्याभोवती फिरायला लागले आणि पहिले सूर्यग्रहण घडले, असे सांगितले जाते. विज्ञानातील काही मान्यतांनुसार पहिले सूर्यग्रहण केव्हा आणि कसे घडले असावे? जाणून घ्या...
5 / 13
सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली, असे सांगितले जाते. यानंतर सूर्यमालेतील विविध ग्रहांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. पृथ्वी, चंद्र, शनी, शुक्र, बुध, मंगळ, गुरू असे ग्रह जे आज आपण पाहतो, तेव्हा ते तयार होण्यास, हळूहळू आकार घेण्यास सुरुवात झाली होती, असे सांगितले जाते.
6 / 13
सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला घडायला सुरुवात झाली. यानंतर लक्षावधी वर्षांनंतर या ग्रहांच्या कक्षा निश्चित व्हायला सुरुवात झाली. सूर्यमाला घडत असताना ग्रह एकमेकांवर आदळत होते. प्रचंड प्रमाणात उल्कापात होत होता.
7 / 13
त्यातूनच हळूहळू ग्रहांचे आकारमान, रचना, सूर्याभोवती फिरण्याची गती, सूर्यापासून असलेले ग्रहांचे अंतर निश्चित होत गेले. एका विध्वंसक घटनेमुळे चंद्राचा जन्म झाला, असे शास्त्रज्ञ मानतात. ब्रह्मांडात ग्रह एकमेकांवर येऊन आदळत होते, तेव्हा मंगळाएवढ्या आकारचा एक ग्रह पृथ्वीवर येऊन जोरदार आदळला. त्याचे नाव आहे थिया.
8 / 13
या अपघातामुळे पृथ्वीचा काही भाग लांबवर फेकला गेला आणि त्यातूनच चंद्राची निर्मिती झाली, असे सांगितले जाते. ही घटना ४.५ अब्ज वर्षांपूर्वीची असून, यावर आज सार्वमत झाले आहे. म्हणजेच पृथ्वीच्या जन्मानंतर २ कोटी ९० लाख वर्षांनतर चंद्राचा जन्म झाला, असे मानले जाते.
9 / 13
पृथ्वीचा जन्म झाला, तेव्हा सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला केवळ तीन ते चार तास लागायचे. मात्र, चंद्राच्या निर्मितीनंतर पृथ्वीचा वेग प्रचंड कमी झाला. पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र अन्य उपग्रहांच्या मानाने बऱ्यापैकी मोठा आहे.
10 / 13
आता जसा गोलाकृती चंद्र आपल्याला दिसतो. तसा दिसण्यासाठी लाखों वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, जेव्हा चंद्र प्रथम सूर्यासमोरून गेला, तेव्हा पहिले सूर्यग्रहण घडले. ही घटना सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी घडली, असे मानले जाते.
11 / 13
पृथ्वी आणि सूर्याच्या मधून चंद्राचे भ्रमण होत असताना सूर्यग्रहण होते, असे मानले जाते. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरून सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात.
12 / 13
यंदाच्या वर्षीचे सूर्यग्रहण वैशाख अमावास्येला लागत असून, या दिवशी शनैश्चर जयंती आहे. वैशाख अमावास्येला भावुका अमावास्या असेही म्हटले जाते. हे सूर्यग्रहण वृषभ राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रावर लागेल. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असून, भारताच्या काही भागात दिसेल, असे सांगितले जात आहे.
13 / 13
भारतीय पंचांगानुसार, सूर्यग्रहणाचा प्रारंभ दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे. ग्रहणाचा मध्य सायंकाळी ०५ वाजून ०३ मिनिटांनी असेल. तर, ग्रहणाचा मोक्ष ६ वाजून ४१ मिनिटांनी होईल. १० जून रोजीचे पहिले सूर्यग्रहण तब्बल ५ तास चालेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण