शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नाव रुपकुंड आणि प्रत्यक्षात सापळ्यांचे बेट? भारतातील अशा दहा रहस्यमयी गावांची माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 11:51 IST

1 / 10
गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार कोणतीही वस्तू वरून खाली येते. म्हणून गाडी पार्किंगच्या वेळी ती उतारावर लावली असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु लडाख येथे असलेले चुंबकीय पठार असे अद्भूत आहे, की त्या पठारावर पार्किंगला लावलेली गाडी उतरंडीला लागायची सोडून ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या बाजूने सरकत जाते. ते पठार 'हिमालय वंडर' या नावानेदेखील ओळखले जाते. वास्तविक ते पठार क्षितीजाशी समांतर असल्याने तसे होणे, हा वैज्ञानिकांच्या दृष्टीने भास आहे असेही म्हटले जाते, परंतु आजवर अनेकांनी तिथे पार्किंग केलेली गाडी २० किमी ताशी वेगाने वर चढतानाचा अनुभव घेतला आहे.
2 / 10
सोळाव्या शतकातील विजयनगरयेथील मंदिर हे आताचे आंध्र प्रदेश येथील अनंतपूर जिल्ह्यात स्थित आहे. तेथील लिपाक्षी मंदिराचा लटकता खांब हे एक आश्चर्य आहे. मंदिराच्या खांबांवर छताचा भार असतानाही तिथला एक खांब हा जमिनीपासून विभक्त आहे. त्या खांबांच्या खालून तुम्ही कागद, कापड सहज एकीकडून दुसरीकडे ओढू शकता. खरे पाहता हा पुरातन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे आणि त्या काळात असे प्रयोग यशस्वीपणे करणे आणि ते आजतागायत टिकून राहणे हे मोठे आश्चर्यच नाही का?
3 / 10
मेघालय येथील चेरापुंजी हे ठिकाणी पर्यटकांचे आवडते क्षेत्र. तिथे एक रबराच्या झाडाचा पूल आहे. हा पूल नैसर्गिक असल्याने त्याचे आकर्षण जास्त आहे. नदी किनार्यांच्या दोहो बाजूंनी असलेली झाडे आपल्या फांद्या नदीच्या पात्रावर कलत्या सोडून मूळांपासून घट्ट होतात. चेरापुंजीयेथील झाडांच्या फांद्या परस्परांशी जोडला जाऊन त्याचा भक्कम पूल तयार झाला आहे. ही जणू काही निसर्गाने मानवासाठी करून दिलेली सोयच म्हणावी लागेल.
4 / 10
मणिपूर येथील लोकटक बेट अतिशय गोड पाण्याचे तळे म्हणून ओळखले जाते. त्याच्या प्राकृतिक सौंदर्यामुळे आणि नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे ते जगातील एकमेव तरंगते बेट आहे. ते एक पर्यटन स्थळ असून स्थानिकांना पाणीपुरवठा व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पर्यटनव्यवसायाला यातून रोजगार मिळतो. त्या बेटावर एक अभयारण्यदेखील आहे. तिथे मणिपूरच्या दुर्मिळ आणि नामशेष होत जाणाऱ्या हरणाचे दर्शन घडते.
5 / 10
अठराव्या शतकात बडा इमंबरा महाल हा लखनऊ शहरात बांधून घेतला गेला. नवाब असाफ अब्दुल्लाने या महालाला युरोप आणि अरबी स्थापत्यशास्त्राच्या आधारे बनवला आहे. स्थापत्यकाराने त्याला चढवलेला भारतीय साज नेत्रदीपक आहे. त्या महालाचे मुख्य सभागृह ५० मीटर लांबच्या लांब असून ते एकाही खांबावर आधारीत नाही. महालाच्या वरच्या भागात हजार पायऱ्या आणि गोंधळून टाकणाऱ्या खोल्या स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.
6 / 10
गुवाहाटीपासून जवळ असणारे मायोंग हे गाव प्राचीन काळापासून काळ्या जादूसाठी ओळखले जाते. या गावाशी निगडीत अनेक लोककथा सांगितल्या जातात. काहींनी त्याचे अनुभवही घेतले आहेत. काळ्या जादूबरोबरच तेथील आयुर्वेदिक जडीबुटी प्रसिद्ध आहे. तेथील वस्तुसंग्रहालयात अनेक प्राचीन गोष्टींचे अवशेष ठेवले आहेत.
7 / 10
या गावात एकेकाळी एकेका घरात ५० ते १०० लोक राहत होते. हे लोक पिढ्यानपिढ्या तिथे राहणारे होते. परंतु एके वर्षी अचानक काय झाले माहित नाही, पण ते गाव रातोरात रिकामे झाले. ते आता फक्त पुरातन अवशेषांचे गाव म्हणून संग्रही ठेवले आहे. तिथे पडक्या भिंती, रिकाम्या वास्तू आणि जुना इतिहास शिल्लक आहे. त्या गावात पुन्हा मानवी वस्ती टिकाव धरू शकली नाही, हे विशेष!
8 / 10
केरळ येथील मल्लकोट जिल्ह्यात स्थित कोधिनी हे गाव जुळ्या मुलांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात २००० लोकांची वस्ती आहे. येथील कुटुंबात एक दोन नाही, तर तब्बल २२० जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. हे प्रमाण वाढतेच आहे. हे आश्चर्य घडण्यामागे अनेक वैज्ञानिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला.
9 / 10
निसर्गसौंदर्याने नटलेले झटिंगा हे छोटेसे गाव पक्ष्यांसाठी स्मशानासमान आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या शेटच्या महिन्यात सायंकाळी पाऊस पडल्यावर घरट्याकडे निघालेले पक्षी मृत्यूमुखी पडून पावसांच्या सरीप्रमाणे जमीनीवर कोसळताना दिसतात. वैज्ञानिकांच्या मते हा पाऊस पक्ष्यांना सोसवत नसावा म्हणून ते मृत्यू पावत असावेत. परंतु, याहून अधिक पाऊस चेरापुंजीसारख्या ठिकाणी पडत असूनही तिथे अशा घटना घडत नाही, मग या गावातच तसे का घडते, याचे रहस्य अद्याप उलगडले नाही.
10 / 10
हे बेट अतिशय प्राचीन आहे आणि हिमालयाच्या कुशीत लपलेले आहे. त्या बेटावर सहसा कोणी जात नाही. मात्र साधारण ५०-६० वर्षांपूर्वी एक पर्यटक तिथे गेला असता, त्याला त्या बेटावर केवळ माणसांचे सापळे सापडले. हे सापळे अस्ताव्यस्त पसरलेले नसून विशिष्ट पद्धतीने रचल्यासारखे आहेत असे त्याने वर्णन केले होते. लोककथेनुसार प्राचीन काळातला एक राजा त्याच्या राणी आणि सैनिकांबरोबर हिमालयातील देवीच्या दर्शनाला जात होता परंतु बर्फाचे वादळ आल्याने ते मृत्यूमुखी पडले आणि त्यांचे सापळे तिथे गोठलेल्या स्थितीत राहिले. आजही उत्खननात तिथे सापळे सापडत आहेत, ते पाहता तिथे जणू काही एखादे गाव वसले असावे, असे वाटते.