१३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवींची पुण्यतिथी; करूया त्यांच्या राजधानीची शब्दसफर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 09:43 IST
1 / 6अहिल्या माता पुण्यश्लोक ठरल्या त्या अनेक कारणांमुळे! पैकी एक म्हणजे त्यांचा धीरोदात्तपणा! आपल्या आप्तजनाचा मृत्यू आपण सहन करू शकत नाही, देवाला दोष देतो, यापुढे त्याची भक्ती करणार नाही म्हणतो, त्याच्यावरचा विश्वास उडाला म्हणत त्याला खडे बोल सुनावतो; इथे तर वयाच्या २९ व्या वर्षी अहिल्या मातेला वैधव्य आलं. पती, पिता, पुत्र, कन्या, जावई, नातू जिव्हाळ्याचे म्हणवणारे सगळेच देवाघरी गेले, अहिल्या माता एकाकी पडली, मात्र त्यांनी कधीच देवाला आणि दैवाला बोल लावले नाहीत. जे घडलं ते आपल्या प्रारब्धाचा भाग आहे असं समजून ईश्वराला साक्ष ठेवून होळकर साम्राज्याची धुरा यशस्वीपणे पेलली. 2 / 6युद्ध फक्त शक्तीने न जिंकता युक्तीनेही कसं जिंकता येतं, हे या रणरागिणी आणि धोरणी राज्यकर्तीने दाखवून दिलं! बालपणापासून महादेवाची भक्त, खंडोबा कुलदैवत त्यामुळे न्यायदान करतानाही हातात कायम शिवलिंग असे. त्यांच्या दरबारात न्याय मिळणार याची खात्री सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही असे!3 / 6आपण जनतेच्या पैशांचे विश्वस्त आहोत याची जाणीव ठेवून, त्यांनी केलेला विकास, शासनाच्या पैशांचा विनियोग, शेतकऱ्यांसाठी योजना, धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी, उभारलेल्या बाजारपेठा, व्यवसाय-उद्योगाला चालना, गोर गरिबांसाठी अन्नछत्र, सुसज्ज सैन्यव्यवस्था, शिक्षण संस्थेला हातभार आणि स्वतःसाठी मात्र महेश्वर येथे नर्मदा मातेच्या समोर बांधलेला छोटासा वाडा! हे सगळं वाचणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं दोन्ही रोमांचित करणारं आहे! 4 / 6अहिल्या मातेच्या प्रेमापोटी कुशल कारागिरांनी हात आखडता न घेता कोरलेली शिल्प डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे. त्यांच्या न्यायमंदिरात उभं राहताना आदरयुक्त भीती जाणवते. प्रशस्त देव्हारा आणि कैक शिवलिंगांचे दर्शन घेताना त्यांच्यातली साध्वी मनात डोकावते. वार्धक्य आले असता पदाचा, राज्यकारभाराचा मोह न ठेवता तुकाराम होळकर या निष्ठांवत सरदाराला राज्यपदी बसवणारी अहिल्या माता निवृत्त होत तृप्ततेने देह ठेवते, तेव्हा राजमाता अहिल्या देवी पुण्यश्लोक अहिल्या माता ठरते!5 / 6मध्य प्रदेश प्रशासनाने या ऐतिहासिक स्थळांची उत्तम देखभाल ठेवली आहे. तिथले वस्तू संग्रहालय आपल्या ज्ञानात भर घालतात आणि एक देदिप्यमान इतिहास आपल्या समोर ठेवतात. आजही तिथे दररोज अक्षयवटाच्या(पारंब्या नसलेला वटवृक्ष) छायेत सहस्र लिंगार्चन केले जाते. 6 / 6अशा विभूतींच्या दर्शनाने वाटतं, त्यांच्या कार्याचा एक अंश जरी आपल्या जीवनात उतरवता आला, तरी जीवन सार्थकी लागेल. त्यासाठी हा इतिहास बघावा, अनुभवावा, पण डोळसपणे, केवळ सहल म्हणून नाही! पुण्यश्लोक अहिल्या मातेला त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शतशः नमन!