शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पितृपक्ष: मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? स्वर्ग-नरक की नवा जन्म कसे ठरते? पाहा, प्रवासचक्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 3:13 PM

1 / 15
Pitru Paksha 2023: भाद्रपदातील वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत पितृ पंधरवडा असतो. या पितृपक्षात त्या त्या तिथीला पितरांचे, पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून श्राद्ध, तर्पण विधी केले जातात. पितृदोष दूर व्हावा, पितरांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी विधी केले जातात. काही ठिकाणी पितरांच्या आवडीच्या गोष्टींचे दान केले जाते. त्यांच्या आवडीचे पदार्थ अर्पण केले जातात. पितृपक्षाचा कालावधी विविध अर्थाने विशेष आणि महत्त्वाचा ठरतो.
2 / 15
पृथ्वीतलावर मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. जो जीव जन्माला आला, त्याचा मृत्यू होणारच हे निर्विवाद सत्य आहे. शिव पुराण, गरुड पुराण आणि कठोपनिषद या काही ग्रथांमध्ये मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे नेमके काय होते, याबाबत माहिती दिली आहे. आत्मा जेव्हा शरीराचा त्याग करते, तेव्हा काही काळापर्यंत अचेत स्थितीत असते. आत्म्याला चेतना अवस्था प्राप्त झाली की, आपल्या परिवाराला, कुटुंबातील सदस्यांना, वारसांना पाहून आत्मा दुःखी होते, असे मानले जाते.
3 / 15
त्यागलेले शरीर पुन्हा एकदा धारण करण्याचा प्रयत्न करते. मात्र, त्यात यश मिळत नाही. यानंतर यम देवाचे दूत येऊन आत्म्याला तीव्र गतीने यमाच्या दरबारात नेतात. तेथे चित्रगुप्त आणि यम सभासद सदर आत्म्याने शरीर रुपात असताना केलेल्या कर्माचा लेखाजोखा मांडतात, अशी मान्यता आहे. मृत्यूनंतर आत्म्याच्या होणाऱ्या प्रवासाबद्दल गरुण पुराणात आणखी काही गोष्टी आल्या आहेत.
4 / 15
मृत्यू झाल्यानंतर आत्मा सुमारे १२ दिवस आपल्या कुटुंबासोबत असते, अशी मान्यता आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर १२ दिवसांपर्यंत विधी केले जातात, असे सांगितले जाते. या १२ दिवसांत पिंडदान आणि अर्पण केलेले जल आत्म्यापर्यंत पोहोचत असते. या दिवसात आत्मा अभौतिक स्वरुपात वावरते. शरीर धारण केले असताना म्हणजचे भौतिक स्वरुपात असताना केलेल्या कर्मांची फळ या कालावधीत आत्म्याला भोगावी लागतात.
5 / 15
१२ दिवसांनंतर यमदूत येतात आणि आत्म्याला घेऊन जातात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गुरुण पुराणानुसार, यममार्ग हा अतिशय खडतर असतो. भौतिक स्वरुपात असताना केलेल्या कर्मानुसार हा मार्ग सुकर किंवा कठीण होतो. १२ महिने, १६ नगर आणि अनेक नरक पार केल्यानंतर आत्म्याचा यमलोकात प्रवेश होतो, असे काही उल्लेख गरुण पुराणात असल्याचे आढळून येते.
6 / 15
गरुण पुराणातील काही उल्लेखानुसार, मृत्यूनंतर १२ दिवसांनी प्रत्येक आत्म्याला अभौतिक स्वरुपातील शरीर प्रदान केले जाते. सदर अभौतिक शरीर भौतिक स्वरुपात असताना केलेली पुण्यकर्म, सत्कर्म यांनुसार स्वर्ग लोकात जाणार की नरकात जाणार, याची निश्चिती केली जाते.
7 / 15
पृथ्वीलोकावरील कर्मांचा हिशोब मांडल्यानंतर पितृलोकातील कर्मे निश्चित केली जातात. पितृलोकातील सर्व भोग भोगून झाल्यानंतरच सदर आत्म्याला नवीन शरीर प्राप्त होते. पितृलोकातील कर्म आणि भोगानुसार नवीन जन्म मिळतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
8 / 15
गरुण पुराणात केलेल्या एका उल्लेखानुसार, ज्या व्यक्ती पुण्यवान असतात, त्याच केवळ पुण्यात्म्यांना विष्णूलोक प्राप्त होते. पुण्यवान व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्रीविष्णूंचे दूत येऊन पुण्यात्म्याला विष्णूलोकात घेऊन जातात.
9 / 15
अन्य आत्म्यांप्रमाणे यांना अभौतिक शरीर धारण करावे लागत नाही. यमलोकात आलेल्या अभौतिक शरीररुपी आत्म्याला यमदूत एका दिवसात सोळाशे किमी चालवतात. महिन्यातून एकदा मृत्यू तिथीला आत्म्याला थांबायची संधी मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
10 / 15
गरुड पुराणात असलेल्या उल्लेखाप्रमाणे कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर संपूर्ण वर्षभर अन्न-जल दान आणि तर्पण करावे. एक दिवस अन्न-जल दान आणि तर्पण केल्यामुळे आत्मा व यमदूतांना बळ मिळते आणि ते पुढील प्रवासाला जातात, अशी मान्यता आहे.
11 / 15
कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यानंतर ज्या घरात तर्पण, अन्न-जल दान केले जात नाही, त्या आत्मा आणि यमदूतांना यममार्गावर अनेक कष्ट सोसावे लागतात. अशाने पूर्वज वारसांवर नाराज होतात. त्यामुळे पितृदोष निर्माण होतो आणि वारसांना अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते, असे सांगितले जाते.
12 / 15
वेदांच्या पितृयज्ञाला पुराणांमध्ये विस्तार मिळाला आणि त्याला श्राद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा फार प्राचीन काळापासून सुरू आला आहे. महाभारताच्या शिस्त पर्वात पितृपक्षासंदर्भातील आख्यायिका असल्याचे सांगितले जाते.
13 / 15
या पर्वात श्राद्ध करण्याची परंपरा सांगितण्यात आली आहे. महाभारतानुसार सर्वप्रथम श्राद्धाचे उपदेश महर्षी नीमीने अत्रीमुनीना दिले होते. प्रभू रामचंद्र हे आपले पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले होते, असे सांगितले जाते.
14 / 15
महाभारताप्रमाणे त्यापूर्वीच्या रामायणातही श्राद्धविधीबाबतचे उल्लेख आढळून येतात. यंदा २०२३ रोजी २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या काळात पितृपक्ष आहे. व्यक्तीच्या निधनाच्या तिथीनुसार, पूर्वज, पितरांचे श्राद्धविधी केले जातात.
15 / 15
- सदर मान्यता आणि दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष