शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Festival 2023: बाप्पाच्या आगमनापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि टाळा 'या' चुका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 2:16 PM

1 / 13
भाद्रपदातील गणेशाची पार्थिव पूजा हा केवळ आपल्या आनंदाचा भाग नाही तर हे एक व्रत आहे. व्रत अंगिकारायचे म्हटले की जबाबदारी आली आणि तिचे पालन करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि नकळतपणे होणाऱ्या चुका टाळल्या पाहिजेत.
2 / 13
१) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी. वास्तविक ही मूर्ती मातीची बनवून ती मातीत विसर्जित करणे हाच मूळ उद्देश होता आणि तो पर्यावरण पूरक होता. मात्र अलीकडे बनणाऱ्या मूर्ती या पर्यावरण दुषणाला हातभार लावत आहेत, म्हणून घरगुती गणेशाची मूर्ती निदान एक फूट असावी यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे!
3 / 13
२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे. वर म्हटल्याप्रमाणे हे पार्थिव पूजन मातीच्या मूर्तीचे असल्याने ती हाताळणे एका व्यक्तीसाठी सोपे होते, मात्र आता जड मूर्तींची ने आण करताना मूर्तीचा अवयव दुखावला जातो, मूर्ती भंग पावते आणि भग्न मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अनुचित ठरते. म्हणून मूर्ती छोटी, सुबक आणि सहज उचलता येण्यासारखी असावी.
4 / 13
३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम. कारण बाप्पा आपल्या भक्ताकडे पाहुणचार घेण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना गायन, नृत्य अलीकडे तर बाईक, गाडी, यानावर बसवून मूर्ती साकारतात. यात कल्पकता नसून हा खेळ आहे. तो देवाशी खेळणे उचित नाही. म्हणून बाप्पाची प्रसन्न मूर्ती आरामदायी आणि आशिष देणारी असावी.
5 / 13
४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये, तसे करणे म्हणजे आपणच आपल्या दैवतांचा अवमान करण्यासारखे आहे. देवतांनी युद्ध केली आहेत, पुराणात तशी नोंदही आहे, पण म्हणून पार्थिव पूजेचा गणपती योद्धा बनवून आणणे हे त्या उत्सवाचे स्वरूप नाही. इतर वेळी कलाकारी म्हणून अशी मूर्ती साकारली तर कलात्मक वाटेल, मात्र पूजेची मूर्ती वरद विनायकाचीच असावी.
6 / 13
५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे. या तिघांची मूर्ती एकत्र छान दिसत असली तरी ती आपण शोभेची मूर्ती म्हणून घरात ठेवू शकतो, पण पूजेच्या मूर्तीत बाप्पाच्या हाती शिवलिंग असेल तर एकवेळ चालेल पण आईवडिलांच्या कुशीत बसलेला बालगणेश पूजेसाठी योग्य नाही.
7 / 13
६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत ती मूर्ती रुमाल टाकून झाकली जाते. यामागे शास्त्र नसून भक्तांचा केवळ भोळा भाव असतो. मात्र देवाचे डोळे झाकणे योग्य नाही. उलट त्याची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहावी म्हणून आपण त्याला पाचारण करतो.
8 / 13
७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही, तोवर ती केवळ मूर्ती समजावी. विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी, त्यानंतरच मूर्तीत देवत्त्व येते आणि तिची पूजा केली जाते.
9 / 13
८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणून प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणु नये.
10 / 13
९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा,गणपती विसर्जनाची घाई करू नये. त्यांचे करवी विधिवत पूजा करून गणपती विसर्जन करावे.
11 / 13
१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये. गणपती हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्याच्या रूपाने मांगल्य घरात येते, ते टिकवण्यासाठी आपणही पावित्र्य जपायला हवे. मतभेद टाळावे आणि आनंदाने सोहळा साजरा करावा.
12 / 13
११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे.
13 / 13
१२) विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ मृदंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्यावा. अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करून आपल्या धर्माची आणि बुद्धिदात्या बाप्पाची विटंबना होईल असे कृत्य करू नये. डॉल्बीच्या भींती उभारून लोकांना त्रास होईल, मनःस्ताप होईल असे विकृतीकरण करू नये. सण आनंदात साजरा झाला तरच त्यात सर्वांना आपणहून सहभागी व्हावेसे वाटेल आणि उत्सवाची परंपरा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत राहील!
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव